प्रताप नाईक, झी मीडिया कोल्हापूर : कोल्हापुरातील एका सावकाराने पतीच्या व्यवसायासाठी घेतलेल्या ३० हजार रुपयांच्या व्याजापोटी अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या नवविवाहितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. इतकच नव्हे तर सावकाराने आपल्या मित्रासह संबंधीत नवविवाहितेवर सामूदायिक बलात्कार करण्याचादेखील प्रयत्न केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी कोल्हापुरातील शाहुपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून कोल्हापूर पोलीस सावकाराचा आणि त्याच्या साथीदाराचा शोध घेत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापुरातील रुईकर कॉलनी परिसरात अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या नवविवाहित आपल्या पतीसह राहत आहे. पीडित नवविवाहीतेच्या पतीनं व्यवसायासाठी खाजगी सावकर हरिश स्वामी याच्याकडून ३० हजार रुपये घेतले होते. त्यांनी दिवसाला तीन हजार रुपये व्याज द्यावे लागेल या अटीवर पैसे दिले. विवाहित युवकाने तीन दिवसांचे १० हजार ५०० रुपये व्याज दिले. चौथ्या दिवसापासून त्याने व्याज दिले नाही. त्यानंतर खाजगी सावकर हरिष स्वामी आणि त्याचे मित्र अशीष पाटील आणि सद्दाम मुल्ला यांनी याने व्याजाच्या पैशासाठी तगादा लावून विवाहितेला व्हॉट्स अ‍ॅप मेसेज, कॉल करून हैराण करून सोडले. आणि त्यानंतर व्याजाच्या पैशाच्या बदल्यात नवविवाहितेवर बलात्कार केला


हरिष स्वामी हा परत पीडित नवविवाहितेला तपोवन मैदानावर नेनून तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत आपले आशिष पाटील आणि सद्दाम मुल्ला या दोन मित्रांशी संबंध ठेवण्यासाठी तगादा लावल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यानंतरदेखील नवविवाहितेला अश्लील शिवीगाळ करणे, रात्री-अपरात्री तिच्या पतीला उचलून नेत मारहाण करणे असे प्रकार तो करू लागला. हा त्रास असह्य झाल्याने विवाहितेने 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती' या सामाजिक संस्थेकडे धाव घेतली.


कोल्हापुरातील सामाजिक महिला कार्यकर्त्यांनी तिला धीर देत पोलीस अधीक्षकांकडे नेले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत डॉ. देशमुख यांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. पण त्यानंतरही खाजगी सावकर हरिष स्वामी याचा मित्र सद्दाम मुल्ला यांने फोन करुन संबधीत पीडित महिलेला धमकी दिली.


या सगळ्या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी तात्काळ शाहुपुरी पोलीस स्टेशनमध्ये बलात्कार आणि सामुदायिक बलात्कार करण्याचा प्रयत्न अशा आरोपांखाली गुन्ह्याची नोंद केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिलीय. 


पीडित विवाहितेसह तिच्या पतीने सुरवातीला तिघा सावकारांविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. पण पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं नव्हतं. त्यामुळं सामाजिक कार्यकर्त्या गीता हसूरकर, सीमा पाटील आणि मंगल पवार यांनी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर या घटनेचा पर्दाफाश झालाय. कोल्हापूर पोलीस खाजगी सावकर आणि त्याच्या मित्रांचा शोध घेत आहे. पण या प्रकरणामुळं कोल्हापुरात खाजगी सावकारांची हिंमत किती वाढली आहे, हेच दिसून येतंय.