कोल्हापूरकरांचा नादच खुळा! ग्राहकांचे केस कापायला सोन्याची कात्री
तब्बल ३ महिन्यानंतर व्यवसायाला परवानगी मिळाल्यानंतर सलून चालकांना मोठा आनंद झाला आहे.
प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : तब्बल ३ महिन्यानंतर व्यवसायाला परवानगी मिळाल्यानंतर सलून चालकांना मोठा आनंद झाला आहे. मात्र कोल्हापूरकरांचा नादच खुळा. इथल्या एका सलून व्यवसायीकाने चक्क सोन्याच्या कात्रीने ग्राहकांचे केस कापून आनंद साजरा केला.
लॉकडाऊनच्या ३ महिन्यांनंतर कोल्हापुरातल्या सलूनमध्ये पहिल्यांदाच केसावर कात्री चालली. पण ज्या कात्रीने केस कापले गेले, ती कात्री सोन्याची होती. कोल्हापुरातल्या रामभाऊ संकपाळ यांनी ग्राहकांचे केस कापण्यासाठी चक्क सोन्याची कात्री वापरली.
तीन महिन्यांनंतर सलून सुरू झाल्यानंतर संकपाळ यांना आनंद झाला. हा आनंद व्यक्त करण्यासाठी आणि कामाचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी त्यांनी लाखो रुपये किंमतीची सोन्याची कात्री वापरली. संकपाळ यांच्याकडची ही कात्री १० तोळे सोन्याची आहे.
आनंदाच्या भरात हातात ग्लोव्हज घालण्याचा विसर रामभाऊंना पडला होता. पण यानिमित्ताने कोल्हापूरकर किती हौशी आहेत, हे अधोरेखित झालंय. कोल्हापूरकरांचा नाद खुळा म्हणतात, ते उगाच नाही.