कोल्हापुरात धनंजय महाडिकांना सतेज पाटलांचा उघड-उघड विरोध
काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष हातात हात घालून निवडणुकीला सामोरं जाणार असले तरी...
प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी कोल्हापूर मतदारसंघाची ओळख.... राष्ट्रवादी काँग्रेसमधून विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांनाच उमेदवारी मिळेल, हे जवळपास निश्चित आहे. पण, त्यांना आता काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी अडचणीत आणलंय. 'ज्यांनी आपला विश्वासघात केला... त्यांना आपण मदत करायची का? आमचं ठरलंय आता ज्यांनी विश्वास घात केला, त्यांना मदत करायची नाही...' असं म्हणत सतेज पाटलांनी महाडिक यांना दणका दिलाय.
अधिक वाचा :- 'काळ्या जादू'चा धसका, काँग्रेस आमदाराच्या घराबाहेर सीसीटीव्ही तैनात
कोल्हापूर जिल्ह्यातले काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री सतेज पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार धनंजय महाडीक यांच्या विरोधात उघड भूमिका घ्यायला सुरुवात केलीय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष हातात हात घालून निवडणुकीला सामोरं जाणार असले तरी ते चित्र कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात दिसेल का? याबद्दल शंका आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात वरवरची लढाई ही राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना दिसत असली तरी काही भागात धनंजय महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी होईल, असं दिसतंय.... त्याचा फायदा काही प्रमाणात शिवसेनेलाच होण्याची शक्यता जास्त आहे.