धक्कादायक! संपत्तीच्या वादातून मुलाकडून वडिलांना जाळून संपवण्याचा प्रयत्न
मुलाने केलेल्या हल्ल्यानंतर वडील गंभीररित्या जखमी झालेत
प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : संपत्तीच्या वादातून कुटुंबात भांडणे झाल्याचे तुम्ही अनेकदा ऐकला असतील. पालक-मुले, भाऊ-बहिण यांच्यात संपत्तीच्या वाटपावरुन (property dispute) अनेकादा वाद होतात. मात्र काही वेळा हे वाद टोकाला जातात. असाच काहीसा प्रकार कोल्हापुरात (kolhapur) घडलाय. कोल्हापूरमध्ये संपत्तीच्या वादातून मुलाने आपल्या पत्नीच्या मदतीने वडिलांना जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (kolhapur son tried to burn their father to death due to a property dispute)
कोल्हापूर जिल्ह्यामधील व्हन्नूर गावात ही घटना घडली असून देवबा हजारे (79 ) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी कागल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी मुलगा शिवाजी आणि सून सरला यांना अटक केलीय. हजारे कुटुंबियात संपत्तीचा वाद इतका टोकाला गेला की, मुलाने आणि सुनाने थेट जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
कागल तालुक्यातील व्हन्नाळी येथील रहिवासी शिवाजी हजारे याचे 79 वर्षीय वडील देवबा हजारे याच्या बरोबर संपत्तीचा (property dispute) वाद सुरु आहे. या वादातून शिवाजी आणि वडीलांमध्ये यांच्यात वारंवार खटके उडत होते. याच रागातून शिवाजी हजारेने देवबा हे शौचास गेल्याचं बघून तू माझ्याविरुद्ध तक्रार करतो काय, असे म्हणत पत्नीच्या मदतीने त्यांच्यावर ज्वालाग्रही पदार्थ टाकले. त्यावेळी देवबा हजारे यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र वयोवृद्ध देवबा हजारे गंभीररित्या भाजून जखमी झाले होते.
दरम्यान, यानंतर देवबा यांना उपचारासाठी कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी कागल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून मुलगा शिवाजी देवबा हजारे आणि त्याची पत्नी सरला शिवाजी हजारे यांना पोलिसांनी अटक केली आहे.