Kolkata Rape Case Sanjay Rathod Mention: कोलकाता येथील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणावरुन आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सु-मोटो याचिकेवर सुनावणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आजच्या 'सामना' अग्रलेखातून महिलांवरील अत्याचाराची ठराविक प्रकरणेच प्रकाशझोतात येतात असं म्हणत भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोप केले आहेत. भारतीय जनता पार्टी कोलकात्यामधील महिला डॉक्टरवरील बालत्कार आणि हत्या प्रकरणाचं राजकीय भांडवल करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. विशेष म्हणजे ही टीका करताना महाराष्ट्रामधील विद्यमान मंत्री संजय राठोड यांचा उल्लेख करत ठाकरे गटाने खोचक टीका केली आहे.


यंत्रणांना जाग आल्याबद्दल आभार पण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकात्यामधील बलात्कार व हत्या प्रकरणानंतर यंत्रणांना जाग आल्याचा उल्लेख करत ठाकरे गटाने, "केंद्र सरकार, सीबीआय, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली आणि चिंता व्यक्त केली याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. हे सर्व प्रकरण पश्चिम बंगालात घडल्याने केंद्राला त्यात इतका रस निर्माण झाला आहे काय?" असा सवाल उपस्थित केला आहे. ममता बॅनर्जी सरकारने या प्रकरणामध्ये योग्य ती कारवाई केल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.


ममता सरकारने केलेल्या कारवाईचं कौतुक


"ममता बॅनर्जी यांच्या सरकारने कोलकात्यामधील आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील बलात्कार व हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपास केला. कोलकाता पोलिसांनी पळून गेलेल्या मुख्य आरोपीस अटक करण्यासाठी खास पथके नेमली. त्यांनी या नराधमाच्या मुसक्या बांधल्या. आता त्याला फासावर लटकवून न्याय केला जाईल. याला कायदा आणि सुव्यवस्थेची बूज राखणे म्हणतात, पण आपल्याकडे बलात्कारासारख्या घटनांचेही राजकारण होते," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे. तसेच, "महिला डॉक्टरवरील बलात्कार व हत्येने फक्त कोलकाताच नव्हे, तर देश हादरला, पण या घटनेचे राजकीय भांडवल ‘भाजप’ करीत आहे," असा आरोप त्यांनी केला आहे. "ममता सरकारविरोधात बलात्कार व हत्येचे प्रकरण पेटवून त्यांचे राज्य बदनाम केले जात आहे. कोलकात्यासारखी प्रकरणे गेल्या महिनाभरात उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांत घडली आहेत," असा आरोपही ठाकरे गटाने केला आहे.


संजय राठोड यांचा उल्लेख


महिलांवरील अत्याचारांचा संदर्भ देताना भाजपावर निशाणा साधत ठाकरे गटाने थेट संजय राठोड यांचा उल्लेख केला आहे. "महाराष्ट्रातील एक मंत्री संजय राठोड यांचे प्रकरण अतिगंभीर आहे. पीडित पूजा चव्हाणने तर आत्महत्याच केली व त्याबद्दल भाजपच्या महिला मंडळाने त्या वेळी आंदोलने केली होती. आज हे महाशय मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसतात व भाजपचे महिला मंडळ या मंत्र्यांची ओवाळणी करत आहे. याप्रकरणीही ना सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली ना तुमच्या त्या सीबीआयने, पण कोलकात्याच्या घटनेने या सगळ्याच संस्था छाती पिटत आहेत. या ढोंगबाजीस काय म्हणावे?" असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.