मुंबई : कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोकण रेल्वेच्या मान्यताप्राप्त संघटनेच्या एका वरिष्ठ नेत्याने बैठक घेतली होती. या बैठकीला कोकण रेल्वेचे कर्मचारी आणि संघटनेची काही लोक असे जवळपास १५ ते २० लोक उपस्थित होते. बैठक घेतलेल्या संघटनेचा पदाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह निघाला. तसेच या पदाधिकाऱ्यांने दुसऱ्या राज्यातून रत्नागिरीत येताना कोकण रेल्वेतून अनधिकृत प्रवास केला होता. बैठकीनंतर पुन्हा दुसऱ्या राज्यात प्रवास केला. त्यामुळे कोरोना संक्रमनाच्या पार्श्वभूमीवर चिंतेत अधिक भर पडली आहे. रत्नागिरीतील कोकण रेल्वेच्या काही कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासाने घेतल्याचे वृत्त आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या मान्यता प्राप्त संघटनेच्या या नेत्याचा तीन राज्यातून अनधिकृत प्रवास केला होता. तसेच रत्नागिरीत रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. याबाबत काहींनी बैठकीबाबत आक्षेप घेतला आहे. कोरोनाचे संकट असताना बैठक कशी घेतली गेली आणि दुसऱ्या राज्यातून आलेल्या या नेत्याबाबत आरोग्य विभागाला का कळविण्यात आले नाही, आरआएम यांनी का लक्ष घातले नाही, असा तक्रारीचा सूर कर्मचाऱ्यांतूनच उमटत आहे. दि. २२ जून २०२० रोजी आरआरएम कार्यालयात कोकण रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दोन पदाधिकारीही आले होते. त्यामुळे आता ज्याने बैठक घेतली ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याने या सगळ्यांना क्वारंटाईन करण्यात यावे तसेच ज्या रेल्वेने प्रवास केला. त्यांचा शोध घेणार का, आदी सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.


कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. रत्नागिरीत कोविड रुग्णांची संख्या वाढत असताना पुन्हा कडक लॉकडाऊन जिल्ह्याधिकाऱ्यांनी लागू केले आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या संघटनेच्या नेत्याने प्रवास केल्यानंतर रत्नागिरीतील कोकण रेल्वे प्रशासनाने कोणतीच काळजी घेतलेली नाही. जर वेळीच ही बाब जिल्ह्या प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला कळवली असती तर आता, बैठकीसाठी असलेल्यांना क्वारंटाईन होण्याची वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे. दरम्यान, आता जिल्हा प्रशासन काय कारवाई करणार याकडेही लक्ष लागले आहे.


दरम्यान, कर्नाटक राज्यातून प्रवास केलेल्या या नेत्याबाबत होनावर येथील शेजाऱ्यांने तक्रार केल्यानंतर त्याला तेथील आरोग्य यंत्रणेने क्वारंटाईन केले होते. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी केली असता  पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्यामुळे रत्नागिरी विभागीय कार्यालयात भीतीचे वातावरण पसरले आहे.