कोकण रेल्वेमध्ये निघालीय बंपर भरती, 56 हजारपर्यंत पगार; `या` पत्त्यावर होईल मुलाखत!
Konkan Railway Job: सध्या कोकण रेल्वेमध्ये विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
Konkan Railway Job: चांगले पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांची भरती केली जाते. सध्या कोकण रेल्वेमध्ये विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
कोकण रेल्वे अंतर्गत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल, ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल,ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल,डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल, तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदांच्या रिक्त 42 जागा भरल्या जाणार आहेत. याचा सविस्तर तपशील पुढे देण्यात आला आहे. EE/कॉन्ट्रॅक्टच्या 3 जागा, सिनीअर टेक्निशियन असिस्टंट/इलेक्ट्रिक या पदाच्या 3 जागा, ज्युनिअर टेक्निशियन असिस्टंट/इलेक्ट्रिक च्या 15 जागा, टेक्निशियन असिस्टंट/सिव्हिलच्या 4, पदांवर भरती करण्यात येणार आहे. डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकलच्या 2, दोन पदांवर भरती करण्यात येणार आहे. तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकलच्या 15 जागा भरल्या जातील.
शैक्षणिक अर्हता आणि पगार
EE/करार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनीयरिंगमधील पदवी / डिप्लोमा असावा. EE/करार या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 56 हजार 100 दिला जाणार आहे. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल पदासाठी उमेदवाराने इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनीयरिंगमधील पदवी / डिप्लोमा असणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवाराला 44 हजार 900 इतका पगार दिला जाईल.
ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदासाठी उमेदवाराने सिव्हिल इंजिनीयरिंगमधील पदवी / डिप्लोमा केलेला असावा. ज्युनियर टेक्निशियनला 35 हजार 400 इतका पगार दिला जाणार आहे. ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल या पदासाठी उमेदवाराने ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल))/इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंग डिप्लोमा, आयटीआय केलेला असावा. यासाठी उमेदवाराला 35 हजार 400 इतका पगार दिला जाईल.डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल या पदासाठी आयटीआय केलेले उमेदवार अर्ज करु शकतात. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला 35 हजार 400 रुपये इतका पगार दिला जाईल. तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनीयरिंगमधील पदवी / डिप्लोमा असणे आवश्यक आहे. पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला 25 हजार 500 रुपये पगार दिला जाणार आहे.
कुठे होईल मुलाखत?
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन माध्यमातून पाठवायचे आहेत. मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. उमेदवारांनी आपल्या अर्जासह एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. जवळ, सीवूड्स रेल्वे स्टेशन, सेक्टर-40, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे. कोकण रेल्वे भरतीसाठी 5 जून ते 21 जून दरम्यान मुलाखती घेतल्या जाणार आहेत. मुलाखतीला येताना आपल्याकडे रेझ्युमेसह सर्व शैक्षणिक कागदपत्रे असतील याची काळजी घ्या. तसेच नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.