ट्रेन स्टेशनवरुन निघून गेली; पूर्व सूचना न देता कोकण रेल्वेचं पावसाळी वेळापत्रक लागू, शेकडो प्रवाशांना मनस्ताप
पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. यामुळे कोकण रेल्वे प्रशासनातर्फे विशेष खबरदारी घेतली जाते.
Konkan Railway Monsoon Time Table 2023 : कोकण रेल्वेचं पावसाळी वेळापत्रक शनिवारपासून लागू झाले आहे. पण, त्याची कल्पनाच प्रवाशांना नसल्यामुळे जवळपास 100 प्रवाशांचा रत्नागिरी रेल्वे स्थानकामध्ये खोळंबा झाला. ट्रेनच्या वेळेनुसार प्रवासी रेल्वे स्थानकावर आले. मात्र, वेळपत्रक बदलल्यामुळे वेळेआधीच ट्रेन निघून गेल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. यामुळे शेकडो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागाला.
मडगावहुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस पकडण्यासाठी प्रवासी नेहमीच्या वेळेप्रमाणे रत्नागिरी स्थानकावर पोहचले. पण त्यापूर्वीच ट्रेन निघून गेली होती. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार साधारणपणे सव्वाचारच्या दरम्यान ही ट्रेन निघून गेली. ज्यावेळी याबाबत रेल्वे प्रशासनाला जाब विचारला गेला त्यावेळी त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तर देण्यात आली अशी माहिती प्रवाशांनी दिली.
सुटी संपवून मुंबईला परत येणाऱ्या प्रवाशांचे हाल
उन्हाळ्याच्या सुटीमुळे अवेक पर्यटक गावी गेले होते. सुटी संपवून मुंबईला परत येणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. अनेक प्रवाशांनी साधारणपणे दोन ते चार महिन्यापूर्वी तिकिट काढलेल्या आहेत. त्यांच्या तिकीटवरती असलेले रेल्वेची वेळ ही वेगळी आहे. पण, ट्रेनची वेळ बदलल्याबाबत प्रवाशांना याबाबत कोणतीच कल्पना रेल्वेने दिली नाही असं प्रवाशांचं म्हणणं आहे.
रत्नागिरीत पाऊस दाखल
रत्नागिरी शहर आणि आसपासच्या परिसरात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. दरम्यान बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरती कोकणातल्या वातावरणात काही बदल जाणवत आहेत. मान्सून लांबला असून किनारपट्टी भागात वारे वाहत आहेत. समुद्राला देखील उधाण आलेलं पाहायला मिळाले. तसंच पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला.
रायगडचा जंजिरा किल्ला पर्यटनासाठी बंद
रायगडचा जंजिरा किल्ला पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे. पावसाळा जवळ आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे उन्हाळी सुटीच्या शेवटच्या हंगामात जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. किल्ल्याकडे जाणारी सर्व प्रवासी जलवाहतूक थांबवण्यात आली आहे.
मुंबईतून गेट वे ते मांडवा ही जलवाहतूक बंद
पावसाळा जवळ आल्याने मुंबईतून गेट वे ते मांडवा ही जलवाहतूक बंद करण्यात आलीये. 26 मे ते 31 ऑगस्टदरम्यान ही जलवाहतूक बंद असणार आहे. मात्र, मांडवा ते भाऊचा धक्का ही रोरो सेवा सुरू राहणार आहे.