Konkan Railway Special Train For Ganpati festival :  कोकणात गणपतीसाठी जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. कोकण रेल्वे मार्गावरील जवळपास सर्वच गाड्या फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेने आणखी काही जादा आणि विशेष गाड्या सोडल्या आहेत. आता गणेश चतुर्थीनिमित्त कोकण रेल्वे मार्गावर नवीन गाड्या धावणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी 13 सप्टेंबरपासून आणखी काही गाड्या सोडण्यात येणार आहे. याचे नियोजन करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे गाडी क्रमांक 01155 ही दिवा जंक्शनहून सप्टेंबर महिन्यात 13 ते 19 आणि 22 व 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7.45 वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी चिपळूण येथे रात्री 1:25 वाजता पोहचेल. गाडी क्र. 01156 ही रेल्वे सप्टेंबर 14 ते 20, मग 23 व 3 ऑक्टोबरला चिपळूणहून दुपारी 1:00 वाजता सुटून त्याच दिवशी दिवा येथे संध्याकाळी 7:00 वाजता पोहोचेल. 


तर गाडी क्र. 01165 ही लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 15 ते 18 सप्टेंबर, 22 व 23 आणि 29 आणि 30 जुलै रोजी रात्री 10.15 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी मंगळुरु येथे पोहचेल, गाडी क्रमांक 01166 ही 16, 18, 19, 23, 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर रोजी मंगळुरु येथून संध्याकाळी 6.40 वाजता सुटणार आहे.


यंदा 19 सप्टेंबर महिन्यात बाप्पाचे आगमन होणार आहे. मुंबईकर चाकरमानी आतापासून कोकणात जाण्याचे नियोजन करतात. बाप्पाच्या आगमनासाठी भाविक तयारीला लागलेत. मिळेल त्या गाडीने ते कोकणात जात असतात. ट्रेनला प्रचंड गर्दी होत असल्याने दरवर्षीच प्रवाशांचे हाल होतात. यंदा नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाटी रेल्वे प्रशासनाने नियोजन केले आहे. यासाठी मध्य रेल्वेने 156 विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला होता. या गाड्या कमी पडत असल्याने आणखी 52 ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. म्हणजे आता एकूण 208 रेल्वेची सेवा कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मिळणार आहे. 52 ट्रेनमध्ये दिवा-चिपळूण दरम्यान आणखी 36 मेमू स्पेशल आणि मुंबई-मंगळुरु दरम्यान 16 स्पेशल ट्रेन सोडण्यात येणार आहेत. 


या जादा गाड्यांना ठाणे, पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव असे थांबे असणार आहेत. प्रथमच पेण येथेही गाड्यांना थांबा देण्यात आल्याने येथून प्रवास करणाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.