रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावर तब्बल दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे अनेक गाड्यांचा खोळंबा झाला. त्यामुळे प्रवाशांचे हाल झालेत. कोकण रेल्वेची देखभाल करणारी  यूटीव्ही मशीन रुळावरून भोके स्टेशनदरम्यान घसरल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. आधीच कोलमडलेल्या वेळापत्रकावर धावणाऱ्या कोकण रेल्वेच्या प्रवाशांचा यामुळे आणखी खोळंबा झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, भोके स्टेशनदरम्यान घसरलेले यूटीव्ही मशीन अर्धवट ट्रॅकवर आणून लाकडी ठोकळ्याच्या आधारे भोके स्टेशनजवळ बाजूच्या दुसऱ्या ट्रॅकवर घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. भोके रेल्वे स्थानकापासून सुमारे एक किमी अंतरावर विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी आवश्यक असलेले खांब आणि अन्य साहित्य या इंजिनद्वारे आणले जात होते. आज अकराच्या सुमारास हे इंजिन रुळावरून घसरले. त्यामुळे भोके दरम्यानची वाहतूक थांबवण्यात आली होती.


रुळावरून घसरलेले इंजिन काढण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित झाली. जवळपास दोन तासानंतर घसरलेले इंजिन रुळावर आणण्यात आले. परंतु इंजिनचे चाक आणि रूळ यांच्यातील गॅप एक्सेल तुटल्याने गॅप तशीच राहिली होती. त्यामुळे आरएमव्हीच्या सहाय्याने हे इंजिन जोडून भोके स्थानकात आणण्यात आले. या कालावधीत कोकण रेल्वेची वाहतूक संथ गतीने सुरू होती. तब्बल दोन तासानंतर वाहतूक पूर्ववत झाली.


कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक उपेंद्रे शेंडे यांनी सांगितले की, कोकण रेल्वेचे विद्युतिकरणाचे काम वेगाने सुरू आहे. दरम्यान, इंजिन रुळावरुन घसल्याने कोकण रेल्वेची वाहतूक खोळंबली होती. आम्ही तातडीने घटनास्थळी पोहोचलो आणि प्रथम तुटलेले एक्सेलला जॅक लावून उचलण्यात आला. त्यानंतर तुटलेल्या मशीनच्या खाली लाकडी दोन फळ्या टाकून मशीन भोके स्थानकाच्या दिशेने आणण्यात आले. त्यामुळे कोकण रेल्वेचा ट्रॅक हा सुरळीत करून देण्यात यश आले.