Kopeshwar Temple Maharashtra: खजुराहो म्हटलं की डोळ्यांसमोर दगडात कोरलेली अप्रतिम शिल्पे उभी राहतात. खजुराहो हे भारतातील मध्यप्रदेशाक आहे. १०-१२ शतकात चंदेल्ल राजपूत राजांनी बांधलेल्या मंदिर समूहासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहितीये का महाराष्ट्रातही अस एक ठिकाण आहे ते महाराष्ट्रातील खजुराहो म्हणून लोकप्रिय आहे. कुठे आहे हे मंदिर? कसे जायचे व मंदिराची अख्यायिका काय आहे? जाणून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रातील कोल्हापूर येथून 60 किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीच्या काठावर खिद्रापूर गाव वसलेले आहे. या गावात कोपेश्वर मंदिर असून या मंदिराची स्थापत्यशैली व वास्तुकलेचा अप्रतिम वारसा लाभला आहे. हे एक शिवमंदिर आहे. मात्र या मंदिरात शिव आणि विष्णु दोघांचा वास आहे. खिद्रापुरचे हे भव्य मंदिर सातव्या शतकामध्ये चालुक्यांच्या राजवटीत बांधण्यास सुरुवात झाली होती. मात्र, सततच्या परकीय आक्रमणांमुळं मंदिराच्या बांधकामात व्यत्यय येत होता. अखेरीस देवगिरीच्या यादव राज्यकर्त्यांनी या मंदिराचे निर्माण कार्य पूर्ण केले. हे मंदिर बांधण्यास तब्बल पाचशे वर्षे लागली असून 12व्या शतकात पूर्णपणे हे मंदिर बांधण्यात आले, अशी नोंदी आढळतात. हे मंदिर जरी शिवमंदिर असले तरी या मंदिरासमोर नंदी नाहीये, अनेकांसाठी हा कुतुहलाचा विषय आहे. 


कोपेश्वर मंदिर चार विभागांमध्ये विभागले गेले आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम स्वर्गमंडप पाडायला मिळतो. स्थापत्यशैली व वास्तुरचनेचा चमत्कारच पाहायला मिळतो. स्वर्गमंडप 48 खांबावर उभा आहे. काळ्या कातळात या स्वर्गमंडपाचे निर्माण केले गेले आहे. विशेष म्हणजे, या स्वर्गमंडपातून आकाशाचे दर्शन होते. 13 फूट व्यासाची रचना आहे. याला गवाक्ष असं म्हणता येईल. स्वर्गमंडपातील 12 खांबावर विविध दिशांच्या देवता व अन्य देवतांही पाहायला मिळतात. त्याचबरोबर अष्टदिग्पाल ही स्तंभावर पाहायला मिळतात. 


स्वर्गमंडपाच्या स्थापत्यशैलीचा एक चमत्कार म्हणजे या मंदिरात वर्षातून एकदाच चंद्राचा प्रकाश येतो. तो दिवस म्हणजे कार्तिकी एकादशीचा. स्वर्गमंडपामध्ये असलेल्या गवाक्षातून कार्तिक पौर्णिमेचा पूर्ण चंद्र आपल्याला पाहता येतो. या स्वर्गमंडपाच्या गवाक्षातून चंद्रप्रकाश खाली येतो आणि खाली असलेल्या १३ फूट व्यासाच्या अखंड रंगशीलेवर प्रकाश टाकतो. 


कोपेश्वर मंदिराची आख्यायिका काय आहे?


खिद्रापुरच्या या मंदिरात कोपेश्वर आणि धोपेश्वर असे दोन देवांचा वास आहे. कोपेश्वर म्हणजे भगवान शिव आणि धोपेश्वर म्हणजे भगवान विष्णु. यामागेही एक आख्यायिका सांगितली जाते. जेव्हा देवी सती यांवी यज्ञकुंडात उडी घेतली तेव्हा भगवान शिव खूपच क्रोधित झाले. भगवान शिव यांच्या हातून राजा दक्षाचा वध झाला. तेव्हा शिवाचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान विष्णु त्यांना येथे घेऊन आले. शिवाचा क्रोध शांत झाल्यानंतर त्यांनी दक्षाला बकरीचे शिर देऊन पुन्हा जीवनदान दिले. या मंदिरात शिव आणि विष्णु दोघांचा वास आहे. क्रोधित झालेला शिव म्हणन कोपेश्वर आणि त्यांचा क्रोध धोपवून धरणारे म्हणून विष्णु यांना धोपेश्वर असं नाव पडलं, अशी आख्यायिका सांगितली जाते. 


खिद्रापूरला कसे जावे?


कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात अगदी पूर्वेला खिद्रापूर हे स्थान आहे. हे पूर्वेचं टोक म्हणता येईल; कारण पुढे कर्नाटक सुरू होतं. कोल्हापूरपासून ते साधारण ७० किलोमीटर अंतरावर आहे. इचलकरंजीमार्गे, हुपरीमार्गे जाता येते. जयसिंगपूर–नृसिंहवाडीमार्गे येता येईल; तसेच मुंबई, पुण्याकडील लोकांना सांगलीतून जयसिंगपूर, नृसिंहवाडीमार्गे १७ किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे.