जगातील क्रूर मानली जाणारी `ही` मॅरेथॉन पुण्याच्या युवकाने जिंकली
विक्रमी वेळेत रोमांचकारकरित्या पूर्ण केली मॅरेथॉन
मुंबई : जगातली अतिशय भयानक अशी 'ला अल्ट्रा' क्रूर रेस, पुण्याच्या युवकाने विक्रमी वेळेत पार केली आहे. ही ५५५ किमीची मॅरेथॉन शर्यंत प्रसिद्ध आहे. ही रेस क्रूर मानली जात असली, तरी हे अंतर पुण्याच्या आशिष कासोदेकरने विक्रमी वेळेत, केवळ १२६ तासांत रोमांचकारकरित्या पूर्ण केले आहे.
जगातली अतिशय भयानक आणि क्रूर रेस म्हणून 'ला अल्ट्रा' ही ५५५ किमीची मॅरेथॉन शर्यंत प्रसिद्ध आहे. या शर्यतीमध्ये जगातील सर्वात उंच पाच खिंडीतून ५५५ किलोमीटरचे अंतर स्पर्धक, साडे पाच दिवसांत पूर्ण करतात. ही खिंड समुद्रसपाटीपासून १७४०० फुटांपेक्षा अधिक उंचीवर आहेत. येथे ऑक्सिजनची पातळी ६० टक्क्यांपेक्षा कमी आहे. म्हणूनच ही स्पर्धा म्हणजे मानवी सहनशक्तीचे एक प्रतीक आहे.
आतापर्यंत ही स्पर्धा १११, २२२ आणि ३३३ किमी या प्रकारात होती. मात्र ५५५ किमीचे हे पहिलेच वर्ष आहे. या वेळी स्पर्धेच्या सुरवातीलाच अनपेक्षितपणे वातावरण खराब झाले होते. खारदुंगला आणि वारीला वर बर्फ पडत होता. खिंडीच्या दोन्ही बाजूला अंदाजे २ किमीपर्यंत १ ते २ फुट बर्फ होता. यामुळेच १७ ते २३ ऑगस्ट २०१९ ला आयोजित केलेली ही स्पर्धा अतिशय ऐतिहासिक ठरली.
१७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजता नुब्रा खोऱ्यातील तीर्थ या गावातून ही स्पर्धा सुरु झाली. ५५५ किमीच्या पाच स्पर्धकांबरोबर ३३३, २२२ आणि १११ किलोमीटर धावणाऱ्या एकूण ३५ धावपटूंनी धावण्यास सुरवात केली.
१११ किलोमीटरचे अंतर सर्व धावपटूंनी २० तासात पूर्ण केले. तर २२२ किलोमीटरचे अंतर ४८ तासांत पूर्ण केले.
१११ किलोमीटरचे अंतर पार करताना धावपटूंनी जगातली सर्वात उंच १८,३८० फुट अशी खरदुंगला खिंड पार केली. तर २२२ आणि ३३३ किलोमीटरच्या धावपटूंनी सर्वात कठीण अशी वारीला आणि टांगलांगला खिंड पार केली.
त्यानंतर केवळ पाच धावपटूंनी सर्वात कठीण असा ५५५ किलोमीटरचा परतीचा टप्पा पूर्ण करण्यास सुरवात केली. तीन दिवसात ३३३ किलोमीटर केल्यावर अजून २२२ किलोमीटर पूर्ण करणे आणि ते ही तांगलांगला आणि वारीला सारख्या भयानक १७ हजार ५०० फूट उंचीची खिंड दोन वेळा सर करणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हती.
परंतु पुण्याचा आशिष कासोदेकर याचा निर्धार पक्का होता. स्पर्धेची अंतिम रेषा लेहमध्ये शांती स्तुपाला होती. त्याने ही स्पर्धा ६ तास अगोदर म्हणजेच केवळ १२६ तासांत रोमांचकारकरित्या पूर्ण केली.
दोन विदेशी स्पर्धकांबरोबर ही स्पर्धा पूर्ण करणारा आशिष हे पहिलेच भारतीय ठरले आहेत. आशिष कासोदेकर भारतातील ५५५ किलोमीटरच्या 'ला अल्ट्रा' स्पर्धेतील पहिलेच धावपटू ठरले आहेत. या अभूतपूर्व यशानंतर तिरंगा फडकवताना भारताची मान गर्वाने उंच केली आहे.