विशाल वैद्य, झी मीडिया, ठाणे : महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेची सध्या जोरदार चर्चा आहे. सरकारची ही योजना कमालीची लोकप्रिय झाल्याचा दावा सरकारच्या वतीनं केला जातोय. त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) लाभार्थी कुटुंबांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) भेट देत आहेत. पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी ठाण्याच्या किसननगरमधील लाभार्थी कुटुंबांची भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदेंनी या महिलांसोबत चर्चा केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महिलांना कसा फायदा होतोय, याची विचारपूसही मुख्यमंत्र्यांनी केल्याची माहिती आहे. स्वत: राज्याचे मुख्यमंत्री आपल्या घरी येऊन विचारपूस करत असल्यानं सर्वसामान्य महिलाही भारावून जात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'लाडकी भेट, कुटुंब भेट'


कुटुंब भेट हा कार्यक्रम राज्यभर राबवला जाणार आहे. शिवसेना शिंदे पक्षाचे 1 लाख कार्यकर्ते प्रत्येकी 15 कुटुंबांना रोज भेट देणार आहेत. एका आठवड्यात 1 कोटी कुटुंबांना भेटण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांनी स्वत: ठाण्यातील 15 कुटुंबांना भेट दिलीय. यावेळे मुख्यमंत्र्यांनी आमची ताकद वाढवा अजून पैसे वाढवू, 1500 वरच थांबणार नाही अशी प्रतिक्रिया दिली.


काय आहे योजना?


या मोहिमेत शिवसेनेचे प्रत्येक मतदार संघातील कार्यकर्ते दिवसाला 15 घरी भेट देणार आहेत, या भेटीत कटुंबाच्या समस्या जाणून घेतली जाणार आहे. योजनेची अंमलबजावणी, नवी नोंदणी, इतर ज्येष्ठ नागरिक, आणि युवकांच्या पर्यंत योजना पोहचल्या याची माहिती घेतली जाणार आहे. लाडकी बहिण, कुटुंब भेट योजनेंतर्गत शिवसैनिक दररोज 10 कुटुंबाना भेट देणार आहेत. 10 दिवसात 100 कुटुंबाना शिवसैनिक भेटणार आहेत.


अॅपमध्ये माहिती गोळा करणार


गोळा केलेली सर्व माहिती एका अॅपमध्ये स्टोर केली जाणार असल्यामुळे प्रत्येक घराची माहिती या अॅपमध्ये मिळणार आहे. या ॲपच्या मार्फत योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या जातील त्याचप्रमाणे किती जणांनी योजनेचा लाभ घेतला याचीही नोंदणी केली जाणार आहे. जवळपास एका महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे जेणेकरून दीड कोटीहून जास्त महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील. या योजनेतील लाभार्थ्यांवर लक्षही ठेवलं जाणार आहे त्याचप्रमाणे कोणते शिवसैनिक हे काम करत आहे यावरही लक्ष ठेवले जाणार आहे.


महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर राज्यभरातील महिलांनी मोठ्या संख्येनं यासाठी नोंदणी केली. लाखोंच्या संख्येनं महिला जोडल्या गेल्याचा सरकारचा दावा आहे. राज्यभरातील महिलांकडून या योजनेचं स्वागत करण्यात आलं. बँकांसमोर गर्दी करून महिलांनी अर्ज भरले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांमधून उत्तम प्रतिसाद मिळतोय. त्यामुळं येत्या काळात ही योजना गेमचेंजर ठरणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.