Divorce Due To Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यामध्ये सुरु केलेल्या 'लाडकी बहीण' योजनेसंदर्भात एक विचित्र प्रकार पुण्यातील छत्रपती शिवाजी नगरमध्ये समोर आला आहे. येथील भारतीय जनता पार्टीचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी 'लाडकी बहीण' योजनेसाठीच्या बॅनरवर कोणतीही पूर्व परवानगी न घेता दोन महिलांचे फोटो लावले. यावरुन सदर महिलेला तिच्या पतीने थेट घटस्फोटाची धमकी दिली आहे. या प्रकरणामध्ये पत्नीने सदर आमदाराविरोधात थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. 


कोण आहेत या महिला? पतीकडून थेट घटस्फोटाचा इशारा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'लाडकी बहीण' योजनेच्या होर्डिंग्जवर पुण्यातील आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दोन महिलांचे फोटो परवानगीशिवाय लावल्याचं समोर आलं आहे. त्यातील एका महिलेचा पती शहरभर लागलेले ते होर्डिंग्ज पाहून इतका संतापला की तिला घटस्फोट द्यायला निघाला आहे. त्या महिलेने आमदार शिरोळे यांच्याविरुद्ध पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. भीम आर्मीचे पदाधिकारी सीताराम गंगावणे यांनी आमदार शिरोळे यांनी घातलेला हा गोंधळ उघडकीस आणला आहे. पुणे येथील छत्रपती शिवाजी नगरमध्ये शिरोळे यांनी लावलेल्या होर्डिंग्जवर नम्रता कावळे आणि भागीरथीबाई कुरणे यांचे फोटो त्यांच्या परवानगीशिवाय छापण्यात आले आहेत. वादात सापडलेल्या या होर्डिंग्जसमोरच गंगावणे यांनी त्या दोन्ही महिलांच्या उपस्थितीत फेसबुक लाइव्ह केले. 


त्या दोघींनी अर्जही भरलेला नाही


होर्डिंग्जवर दिसणाऱ्या दोन्ही महिलांनी 'लाडकी बहीण' योजनेसाठी अर्जही केलेले नाहीत. आमदार शिरोळे यांनी फोटो लावण्यापूर्वी त्यांची परवानगीही घेतलेली नाही. तरीसुद्धा शिवाजी नगर परिसरात नाक्यानाक्यांवर शिरोळे यांनी या दोन महिलांचे फोटो असणारे होर्डिंग्ज लावले आहेत. ही चक्क फसवणूक असल्याचे गंगावणे म्हणाले. भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी शिडी लावून त्या होर्डिंग्जवरील संबंधित महिलांचे फोटो कट करून शिरोळे आणि शिंदे सरकारचा निषेध नोंदवला. शिंदे सरकारची 'लाडकी बहीण' योजना गरीब महिलांचे संसार उध्वस्त करायला उठली आहे, अशी टीकाही या कार्यकर्त्यांनी केली. 


नक्की वाचा >> 'पवार साहेबांचा पक्ष चोरून अजितदादांची..', 'सुपारीबाज'वरुन मनसे आक्रमक; 'पावसाळी बेडूक' म्हणत टीका


फेसबुक पोस्ट डिलिट करण्यासाठी पोलिसांचा दबाव


नम्रता कावळे आणि भागीरथीबाई कुरणे यांनी यासंदर्भात पुणे पोलीस आयुक्तांकडे आमदार शिरोळे यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, गंगावणे यांना या प्रकारानंतर शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली आहे. आमदार शिरोळे यांच्या दबावामुळे ही अटक झाल्याचा गंगावणेंच्या समर्थकांचा आरोप आहे. त्यानंतर पोलिसांनी गंगावणे यांना फेसबुक पोस्ट तातडीने डिलिट करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचंही सांगण्यात येत आहे. गंगावणे यांनी पोस्ट डिलीट केली नाही गुन्हा नोंदवू, असा दमही पोलिसांनी भरल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगितले जात आहे.