`निवडणुकीत आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार` आमदाराच्या वक्तव्याने खळबळ
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना ही महायुतीची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा महायुतीने महाराष्ट्राभर प्रसार केला आहे. या योजनेला महाराष्ट्रातील महिलांचाही भरघोस प्रतिसाद मिळत असताना एका आमदाराच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना ही महायुतीची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा महायुतीने (Mahayuti) महाराष्ट्राभर प्रसार केला आहे. या योजनेला महाराष्ट्रातील महिलांचाही भरघोस प्रतिसाद मिळत असताना एका आमदाराच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. अमरावतीत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचं (CM Ladki Bahin Yojana) प्रमाणपत्र वितरण सोहळा आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला हजारो महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात बोलताना आमदार रवी राणा यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं.
'आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेच्या 1500 रुपयांचे 3 हजार करू, त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. पण ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही मी तुमचा भाऊ ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून परत घेणार' असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. ज्याचं खाल्लं त्यासाठी जागलं पाहिजे, सरकार देत राहतं, पण सरकारला आशिर्वादही दिला पाहिजे असंही रवी राणा यांनी म्हटंलय. रवी राणा यांचं वक्तव्याने आता एकच खळबळ उडाली आहे. या योजनेवरुन विरोधकांनी आधीच सरकारवर आरोप केले आहेत.
लाडकी बहीण योजना काय आहे?
महायुती सरकारने अर्थसंकल्प मांडताना 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गंत राज्यातील 21 ते 65 वर्षं वयोगटातील पात्र महिलांना दरमहिना 1500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. या योजनेचा लाभ सुमारे एक कोटी महिलांना मिळणार आहे. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. सरकारला वर्षाला 46 हजार कोटींचा आर्थिक भार उचलावा लागणार आहे. 1 जुलैपासून या योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत. 31 ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
योजनेचा अर्ज कुठे मिळेल?
राज्यातील सेतू कार्यालयं, तहसील कार्यालयात लाडकी बहिण योजनेचा अर्ज मिळतो. योजनेला मिळत असलेला प्रतिसाद पाहाता या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आता 31 ऑगस्टपर्यंत महिलांना अर्ज भरता येणार आहेत. अर्ज घेतल्यानंतर तो अर्ज जवळील अंगणवाडी केंद्रात जमा करायचा आहे.
अर्जात कोणती माहिती भरायची?
लाडकी बहिण योजनेचा अर्ज उपलब्ध झाल्यानंतर यात कोणती माहिती भरायची हे देखील समोर आलं आहे. अर्ज करणाऱ्या महिलेला नाव, पत्ता, वैवाहिक माहिती, बँक अकाऊंट, जन्माचं ठिकाण इत्याही माहिती भरायची आहे.