माळशेज घाटात दरड कोसळल्याने दोघांचा मृत्यू! रिक्षावर डोंगरकडा पडून काका-पुतण्याचा अंत
Landslide In Malshej Ghat: कल्याण-अहमदनगरला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 चा भाग असलेल्या माळशेज घाटामध्ये हा अपघात घडला असून अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
Landslide In Malshej Ghat: कल्याणवरुन अहमदनगरला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 222 वर माळशेज घाटात दरड कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. मरण पावलेल्यांमध्ये एका 7 वर्षीय चिमुकल्याचाही समावेश आहे. मुंबईहून भालेराव कुटुंबीय अहमनगरमधील आपल्या मूळ गावी जात असतानाच माळशेज घाटात हा दुर्देवी अपघात घडला. या अपघातामध्ये 3 जण जखमी झाले आहेत.
मुलुंडवरुन अहमदनगरला जाताना अपघात
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मुलुंड येथील भालेराव कुटुंबीय रिक्षाने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामधील चंदनापूर येथे मूळ गावी जात होते. मुरबाड सोडल्यानंतर पुढे टोकावडे पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या घाटरस्त्यावरुन त्यांची रिक्षा जात असतानाच अचानक रिक्षावर दरड कोसळली. या दरडीखाली रिक्षा अडकली. रिक्षातील तिघांनी प्रसंगावधान दाखवत स्वत:चे प्राण वाचवले. मात्र या अपघातामध्ये काका-पुतण्याचा दुर्देवी अंत झाला. या घटनेची माहिती मिळताच टोकावडे पोलीस स्थानकातील कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मरण पावलेल्यांमध्ये काका-पुतण्याचा समावेश
मरण पावलेल्यांची ओळख पटली असून मृत व्यक्तीचं नाव राहुल भालेराव असं आहे. राहुल हा 30 वर्षांचा होता. तर राहुलचा 7 वर्षीय पुतण्या स्वयं याचाही या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आहे. रिक्षातील अन्य तीन व्यक्तींचा जीव थोडक्यात वाचला असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून या घाटासहीत आजूबाजूच्या परिसरामध्ये पावसाच्या मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या सरी कोसळत असून त्यामुळे घाटात मोठ्याप्रमाणात धबधबे पाहायला मिळत आहेत. मात्र याच पावसामुळे घाटातील डोंगरांच्या कपाऱ्यांमध्ये पाणी जाऊन डोंगरावरील माती तसेच डोंगरकडे थेट महामार्गावर कोसळून अपघात होतात. असाच अपघात यंदा पाहिल्या पावसातच झाला आहे.
पर्यायी मार्ग नाही
कल्याणवरुन अहमदनगरच्या दिशेने जाण्यासाठी माळशेज घाटातून जाणारा हा एकमेव मार्ग आहे. कल्याण तसेच अहमनगर डेपोमधून दररोज मोठ्या संख्येनं राज्य परिवहन महामंडळाच्या बस या मार्गावर सोडल्या जातात. ओतूर, आळेफाटा, बीड, पारनेर, संगमनेर या मार्गाने जाणाऱ्या एसटी बसला या माळशेज घाटातून जावं लागतं. पावसाळ्यामध्ये या घटातून प्रवाशांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो.
पर्यटकांची गर्दी, खबरदारी आवश्यक
दरवर्षी, पावसाळ्यात कल्याण -नगर मार्गावर दरड कोसळते. यंदा पहिल्या पावसातच दरड कोसळून दोघांना प्राण गमवावे लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. दर पावसाळ्यामध्ये माळशेज घाटातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक येत असतात. या ठिकाणी नेट फेन्सिंगच्या माध्यमातून दरड कोसळणार नाही यासंदर्भात अनेक ठिकाणी खबरदारी घेण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही दरवर्षी येथे दरड कोसळण्याच्या घटना घडतात. अनेकदा या ठिकाणी पर्यटक येथील एकूण परिस्थितीची कल्पना नसताना धाडसी निर्णय घेत घाटरस्त्यामध्येच वाहने थांबवून धबधब्यांमध्ये भिजतात. मात्र अशाप्रकारे पावसाळ्यामध्ये घाटात थांबणं हे धोकादायक ठरु शकतं. हा संपूर्ण घाट दरडप्रवण क्षेत्र असून दरवर्षी या ठिकाणी असे अपघात होत असतात.