लातूर : लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातून अत्यंत धक्कादायक आणि तितकीच संतापजनक बातमी समोर येतेय. अवघ्या १३ दिवसांची चिमुकली सतत रडत असल्याने सख्ख्या मामाने पाण्याच्या टाकीत बुडवून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाकूर तालुक्यातील झरी बुद्रूक ही घटना असून एक महिला बाळंतपणासाठी माहेरी आली होती. १३ दिवसांपूर्वी तिने एका चिमुकलीला जन्म दिला. घरात सर्वच जण आनंदी होते. मात्र चिमुकली रडत असल्याचा त्रास तिचा १९ वर्षीय मामा कृष्णा अंकुश शिंदे याला होत होता. 


अवघ्या काही दिवसांची आपली भाची रडत असल्यामुळे मामा कृष्णा शिंदेची झोप खराब होत होती. त्यामुळे चिडून आरोपीने १३ दिवसांच्या चिमुकलीची गुपचूप ड्रम मध्ये बुडवून निर्दयीपणे हत्या केली आहे. 



त्यानंतर चिमुकलीच्या आईसह सर्वच जण मुलीचा शोध घेऊ लागले. त्यावेळी घरातील ड्रममध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळुन आला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. यानंतर कुटुंबीयांनी चाकूर पोलीस ठाण्यात याची रीतसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान केली. 


त्यात १३ दिवसीय चिमुकली सतत रडत असल्यामुळे तिचा सख्खा मामा कृष्णा अंकुश शिंदे यांची झोप खराब होत असल्यामुळे पाण्याच्या ड्रम मध्ये बुडवून हत्या केल्याचे तपासात सिध्द झाले. 


या घटनेमुळे झरी गावासह लातूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात आरोपी कृष्णा अंकुश शिंदे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे.