जुगाडची कमाल, तांत्रिक शिक्षण नसतानाही बुलेट ट्रॅक्टरची निर्मिती
ट्रॅक्टरने (Tractor) शेती करणं सर्वच शेतकऱ्यांना (Farmers) पैशांअभावी जमत नाही. अशांच्या मदतीसाठी लातूरचा एक अवलिया धावून आला आहे.
शशिकांत पाटील / लातूर : ट्रॅक्टरने (Tractor) शेती करणं सर्वच शेतकऱ्यांना (Farmers) पैशांअभावी जमत नाही. अशांच्या मदतीसाठी लातूरचा एक अवलिया धावून आला आहे. नेमकं काय केलंय त्याने ते पाहूया. लातूर (Latur) जिल्ह्याच्या निलंगामधील हे आहेत मकबूल शेख. निलंगा शहरात त्यांचं शेती अवजारांचं वर्कशॉप आहे. फक्त सातवीपर्यंत शिकलेले मकबूल लहानपणापासूनच गॅरेजमध्ये काम करत आहेत.
कसलंही तांत्रिक शिक्षण नसतानाही मकबूल शेख यांनी ट्रॅक्टर रिपेरिंग करतानाच, विविध प्रयोग करून बुलेट इंजिनच्या साहाय्याने ट्रॅक्टर बनवला आहे. ५ हॉर्स पॉवरचा तीन चाकी आणि १० हॉर्स पॉवरचा चार चाकी बुलेट ट्रॅक्टर मकबूल यांनी बनवला आहे. १० एचपीचा बुलेट ट्रॅक्टर १ लाख ६० हजार रुपयांना ते विकतात. म्हणजेच चांगल्या बैलजोडीच्या किमतीपेक्षा कमी किमतीत हा बुलेट ट्रॅक्टर उपलब्ध आहे.
प्रत्येक शेतकऱ्याला ५ ते ७ लाखाचा ट्रॅक्टर खरेदी करणं शक्य नसतं. मकबूल यांच्या या अनोख्या ट्रॅक्टरनं शेती मशागतीची अनेक कामं केली जातात. अगदी दीड टनापर्यंत ट्रॉलीही या बुलेट ट्रॅक्टरद्वारे ओढता येते.
मकबूल शेख यांनी १० हर्स पॉवरचे आतापर्यंत १४० बुलेट ट्रॅक्टर विकले आहेत. त्यामुळे मकबूल यांच्या या बुलेट ट्रॅक्टरला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा संशोधक म्हणून पुरस्कारही मिळालाय. महाराष्ट्रासह परराज्यांतूनही या ट्रॅक्टरला वाढती मागणी आहे.