लातूर : लातूर शहर आणि जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकन गुनिया या स्वच्छ पाण्यातील डासांमुळे होणाऱ्या साथीच्या आजाराचा मोठा प्रादुर्भाव झालाय. जिल्ह्यात आतापर्यंत १७४ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. यात ०३ ते ०४ जणांचा मृत्यू झालाय. तर २७ रुग्ण चिकन गुनियाचे आढळून आले आहेत. लातूर महापालिका हद्दीत याचा मोठा उद्रेक असल्यामुळे पुढील महिन्याभरात डेंग्यू-चिकन गुनियाला हद्दपार करण्यासाठी मनपा पाऊलं उचलू लागली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लातूर शहर आणि जिल्ह्यात सध्या स्वच्छ पाण्यातील डासांमुळे होणाऱ्या डेंग्यू आणि चिकन गुनिया या साथीच्या आजारांमुळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. मुळात लातूर शहरात १० दिवसाआड नळाला पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिक आप-आपल्या घरात पाणी साठवून ठेवतात. मात्र शहरातील अनेक भागात हे पाणी झाकून न ठेवल्यामुळे त्यात डेंग्यू-चिकन गुनियाचे डास तयार होऊन याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी शासकीय तसेच खाजगी रुग्णालये रुग्णानी अक्षरशः भरून गेले आहेत. 



ज्यात लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १२३, लातूर जिल्ह्यात ३८ तर मनपा हद्दीत १३ रुग्ण डेंग्यूचे गेल्या वर्षभरात आढळले आहेत. यात खाजगी रुग्णालयातील डेंग्यूचा आकडा मिळू शकला नाहीत. यात जिल्ह्यात आतापर्यंत ०३ ते ०४ जणांचा मृत्यूही झालाय. तर चिकन गुनियाचे एकूण २७ रुग्ण आढळले आहेत ज्यात १८ रुग्ण हे लातूर शहरातील आहेत. सध्या अनेक जण उपचार घेत आहेत. 


नागरिकांनी वेळच्या वेळी कोरडा दिवस पाळला तर या आजारावर नियंत्रण मिळविता येतं. त्यामुळे ताप आला तर तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करून योग्य ती काळजी घेतल्यास या आजारावर मात करता येऊ शकते असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 


मनपा हद्दीतील डेंग्यू चिकन गुनियाचा आकडा हा अनुक्रमे १३ आणि १८ दिसत असला तरी खाजगी रुग्णालयातील आकडे यापेक्षा मोठे असण्याची भीती आहे. कारण प्रत्येक घरातील कोणी ना कोणी तरी या आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे लातूर मनपाने पुढील एक महिन्यात डेंगू-चिकन गुनिया हद्दपार करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ज्यात दररोज दोन प्रभागात यंत्रणा राबविण्यात येऊन नालेसफाई, धूर फवारणी, अबेटिंग, औषध फवारणी केली जाणार आहे. 


एकूणच लातूर मनपाने डेंग्यू-चिकन गुनिया निर्मूलनासाठी विशेष मोहीम हाती घेतली असली तरी नागरिकांनीही हे आजार होऊ नयेत यासाठी काळजी घेणे तितकेच गरजेचे बनले आहे.