लातूर : लातूर जिल्ह्यातून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे आढळून आलेल्या कोरोनाच्या ८ पॉझिटिव्ह रुग्णांचा दुसरा अहवालही निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे लातूर जिल्हा हा कोरोनामुक्त जिल्हा झाला आहे. हे सर्व ८ कोरोना निगेटिव्ह रुग्ण हे आंध्रप्रदेश राज्याच्या करनुल जिल्ह्यातील प्रवासी यात्रेकरू आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ३ एप्रिल रोजी हरियाणाच्या नुह जिल्ह्यातील फिरोजपुर जिरखा येथून १२ प्रवासी हे लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे आले होते. त्यांना निलंगा शहरातील एका प्रार्थना स्थळातून आरोग्य तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. ०४ एप्रिल रोजी १२ पैकी ०८ जणांचे कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आले होते. 


हे देखील वाचा : बांधकाम कामगारांच्या खात्यात थेट २ हजार रुपये जमा



त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. या सर्वांवर लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेत उपचार केले जात होते. काल रात्री उशिरा या सर्व आठही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा दुसरा अहवाल ही निगेटिव्ह आल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली. 


या सर्व आठ ही रूग्णांना लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेतून सुट्टी देण्यात आली असून त्यांना निलंगा येथे क्वारंटाईन केलं जाणार आहे. शासनाच्या पुढील आदेशानंतरच या सर्वांना आंध्रप्रदेश राज्याच्या करनुल जिल्ह्यात पाठविले जाणार आहे.  


एकूणच लातूर जिल्हा आता कोरोनामुक्त जिल्हा झाला असून जिल्ह्यात आता एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही. ही माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी ट्विट करून दिली. तर लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी ही एका व्हिडिओद्वारे ही माहिती सर्व लातूरकरांसोबत शेअर केली. 


तसेच सर्व डॉक्टर, आरोग्य अधिकारी-कर्मचारी यांचेही लातूरच्या महापौरांनी यावेळी आभार मानले. सर्व आठही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे लातूर कोरोनामुक्त झालं आहे. आता लातूर जिल्हा ही ग्रीन झोन मध्ये आला आहे. सर्व आरोग्य अधिकारी, कर्मचारी, पोलीस, मनपा अधिकारी कर्मचारी आणि तमाम लातूरकरांचे आभार. आपण सर्वांनी घरीच राहावे अशी विनंती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केली.