Latur Crime News : औसा ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीवेळी शस्रक्रियादरम्यान महिलेच्या पोटात कापड राहिल्याचा धक्कादायक प्रकार समार आला आहे. हा कापड औसातील डॉक्टरांकडून पोटात राहिल्याचा आरोप महिलेसह तिच्या नातेवाईकांनी केला आहे. उमरगा इथल्या एका खासगी रुग्णालयात सोनोग्राफी आणि सीटी स्कॅन केल्यानंतर हा प्रकार समोर आलाय. ऑपरेशन करून महिलेच्या पोटातून दीड बाय एक फुटांचा कापड बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करू, अशी माहिती औसा रुग्णालय प्रशासनानं दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लातूर जिल्ह्यातील औसा ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. औसा येथे शस्रक्रिया करून प्रसूती केलेल्या महिलेच्या पोटात कापड निघाल्याने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे त्यामुळे तीन महिने कापड पोटात राहिल्याने ही महिला मरणाच्या जबड्यातून थोडक्यात बचावली आहे. हबीबा वसीम जेवळे असे त्या महिलेचे नाव आहे. 


ही महिला प्रसूतीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली होती. तिच्यावर 23 एप्रिल रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र बाळ बाहेर काढल्यावर रक्त पुसण्यासाठी वापरला जाणारा कपड मध्येच ठेवून टाके घेण्यात आले. डिस्चार्ज नंतर महिलेच्या पोटातून पाणी येत असल्याने सदर महिला पुन्हा औसा ग्रामीण रुग्णालयात आली असता येथील डॉक्टरांनी तिला लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविले. तेथे या महिलेवर जवळपास वीस दिवस उपचार करण्यात आले. तरीही टाक्यातून पू येत असल्याने औशातील दोन खाजगी डॉक्टरांचा उपचार या महिलेने घेतला. मात्र टाके भरून येत नसल्याने त्यांनी उमरगा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखविले. सोनोग्राफी, सीटी स्कॅन केल्यावर पोटात गाठ असल्याचे निदान झाले. ही गाठ काढण्यासाठी ऑपरेशन केले असता पोटात गाठ नाही तर चक्क दीड बाय एक फुटाचा कपडा (मॉब) निघाला. हा कपडा औशाच्या रुग्णालयातच राहिल्याचा आरोप महिलेसह नातेवाईकांनी केला आहे.


पोटात नँपकिन निघालेल्या महिलेल्या प्रकरणावरून रूग्णालय प्रशासन गंभीर आहे. या संदर्भात वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. समितीच्या चौकशीनंतर योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे.