माजी सैनिकाचा गोळी लागून घरातच मृत्यू; लातूरमध्ये खळबळ
Latur News : माजी सैनिकाचा घरातच गोळी लागून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उ़़डाली आहे. घटनेची माहिती मिळताच लातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. माजी सैनिकाचा मृत्यू नेमका कसा झाला याचा पोलीस तपास करत आहेत.
वैभव बालकुंदे, झी मीडिया, लातूर : भारतीय सैन्यदलातील (Indian Army) माजी सैनिकाचा घरातच बंदुकीची गोळी लागल्याने मृत्यू झाल्याची खळबळजळ घटना लातूरमध्ये (Latur News) उघडकीस आली आहे. सुशील कावळे असे या मृत माजी सैनिकाचे नाव आहे. लातूर शहरातील विशाल नगर भागात कावळे यांचे घर आहे. सुशील कावळे यांच्या खोलीत जोरात आवाज झाल्याने त्यांचे कुटुंबिय तिथे गेले. त्यानंतर त्यांना धक्का बसला. सुशील कावळे यांच्या खोलीत जाऊन पाहिले असता पिस्तुल त्यांच्या बाजूला पडलेली आढळून आली. Iv
घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कर्मचारी (Latur Police) सुशील कावळे यांच्या घरी दाखल झाले आहेत. कावळे यांचा पिस्तुल साफ करताना गोळी लागून मृत्यू झाला का त्यांनी आत्महत्या केली आहे? अशा सगळ्या बाजूने एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत. सुशील कावळे हे दोन वर्षापूर्वी सैन्यातून निवृत्त झाले होते.
जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर एका युवकाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयच्या आवारातील भिंतीला लागून असलेल्या व्यवसायिकांच्या अतिक्रमित दुकाने जिल्हा अधिकारी यांच्या आदेशाने तोडण्यात आली होती. पंधरा दिवसांपूर्वी ही कारवाई झाली असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या व्यवसायिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदने देऊन पुन्हा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मागितली होती. परंतु त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने जिल्हा स्त्री रुग्णालयासमोर व्यावसायिक रवी सरदार या युवकाने पेट्रोल अंगावर ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस प्रशासनाने तात्काळ जिल्हा स्त्री रुग्णालयाजवळ धाव घेऊन तरुणाला रोखले. त्या युवकाने यासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधिष्ठाता आरती कुलवाल आणि जिल्हाधिकारी निमा अरोरा जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर व्यापाऱ्यांनी दुकाने पुन्हा सुरू कारणासाठी मागणी केली आहे.