मजुरी करून आईनं शिकवलं, पण दहावीचा निकाल ऐकण्यापूर्वीच आईचं निधन
नशिबाची खेळी ....
लातूर : लातूर जिल्ह्याच्या जळकोट तालुक्यातील होकर्णा गावातील ही आहे कु. रेणुका दिलीप गुंडरे. नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात रेणुकाने तब्बल ९३.४०% इतके गुण मिळवले. पण, दुर्दैवाने निकालाच्या आदल्या दिवशीच तिच्यावर नियतीनंच घाला घातला. तिची आई अनिता दिलीप गुंडरे यांचा मृत्यू झाला.
शेतात काम करत असताना सर्प दंशाने त्यांचा मृत्यू झाला. ९ वर्षांपूर्वी पती दिलीप गुंडरे यांचे निधन झाल्यानंतर आई अनिता यांनी कसंबसं आपल्या तीन मुलींना वाढवलं. दोन एकर कोरडवाहू शेती पाहत मोलमजुरी करून त्यांनी रेणुकासह तीनही मुलींना शिकवलं. मात्र दहावीच्या निकालाच्या आदल्या दिवशीच त्यांचा मृत्यू झाला.
'आई आता मी हा निकाल कुणाला सांगू ? बाबा तर नाहीतच, आता तू ही सोडून गेलीस..''अशी आर्त किंकाळी रेणुकाने आईच्या निधनानंतर फोडी.आपल्या मुलीने मोठं होऊन अधिकारी व्हावं असं त्यांचं स्वप्न होतं. जर आता कुणाचा आधार मिळाला तर शिकू अस रेणुकाला वाटतं.
आईच्या अशा अचानक जाण्याने या तिघी बहिणी प्रचंड मानसिक धक्क्यात आहेत. रेणुकाचे आजी-आजोबा आणि चुलते शेजारीच वेगळं राहतात. त्यामुळे पुढे या तिघी बहिणींचं काय होणार याचे उत्तर सध्या तरी कोणाकडेच नाही. त्यामुळे समाजातील दानशूर मंडळींनी पुढे येऊन मदत करावी असं ग्रामस्थ आणि नातेवाईकांना वाटत आहे.
वडिलांचे छत्र हरवल्यानंतरही आईने जिद्दीने शिकवलं. पण नियतीच्या मनात काही औरच असल्यामुळे कोवळ्या वयात कु. रेणुका, अश्विनी आणि शिवानीवर आईच्या निधनामुळे आभाळ फाटलं आहे. लहान बहीण अश्विनी आणि शिवानी यांना वाढवणं आणि शिकवणं असं मोठं आव्हान रेणुकापुढे उभं आहे. हालाखीच्या परिस्थितीतून ९४ टक्के गुण घेणाऱ्या रेणुकाचे शिक्षण वाया जाऊ नये याची काळजी आता समाजाने करून ती समर्थपणे उचललीही पाहिजे.