शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर :  लातूर शहराला पाणी पुरवठा करणारं मांजरा धरण तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. त्यामुळे लातूरकरांच्या पाण्याची चिंता मिटली होती. मात्र असं असूनही आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा सुरू आहे. कायम पाणी टंचाईचे चटके सहन करणारं शहर म्हणून लातूरची ओळख आहे. २०१६ च्या दुष्काळात मांजरा धरण कोरडं ठाक पडल्यामुळे लातूरला चक्क रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला होता. यंदा वरूणराजा लातूरवर प्रसन्न झाला. यंदाच्या पावसात चांगला पाऊस झाला. त्यामुळे कधी नव्हे ते मांजरा धरणं १०० टक्के भरलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरात दररोज किंवा दिवसाआड पाणी पुरवठा होईल अशी आशा नागरिकांना होती. मात्र पाणी पुवरठ्याची व्यवस्था तकलादू असल्यामुळे आणि त्याचसोबत जलशुद्धीकरण केंद्राची स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे उन्हाळा संपेपर्यंत लातूरकरांना आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा करण्यात येणारे. 



कृत्रिम पाणी टंचाईवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीकेचे आसूड ओढतायत. मांजरा धरण साठ टक्के भरल्यानंतर लातूरकरांना दररोज पाणी पुरवठा करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनानं दिल्या होत्या. मात्र जलशुद्धीकरण केंद्राचं काम रखडल्यामुळे पुढील सहा महिने तरी लातुरकरांना आठवड्यातून ऐकदाच पाण्याचं दर्शन होणार आहे.. 


आडातच नाही तर पोहऱ्यात कसं येणार असं म्हणन्याची वेळ लातूरकरांवर आलीय. त्यामुळे या कृत्रिम पाणी टंचाईतून लवकरात लवकर बाहेर काढण्याची मागणी जोर धरु लागलीय.