`झी २४ तास`च्या बातमीनंतर राज्यमंत्र्यांनी घेतली तिच्या शिक्षणाची जबाबदारी
रेणुकाला राज्यभरातून मदतीचा ओघ
शशिकांत पाटील, झी मिडिया, लातूर : वडिलांचे छत्र हरवल्यानंतर हालाखीच्या परिस्थितीतुन आईने तिला शिकवलं. मात्र दुर्दैवाने दहावीच्या निकालाच्या आदल्या दिवशीच तिच्या आईचे निधन झाले होते. तर दहावीत 'त्या' मुलीला तब्बल ९४% इतके गुण मिळाले होते. आता हा निकाल मी कुणाला सांगू असा टाहो लातूर जिल्ह्याच्या जळकोट तालुक्यातील होकर्णा येथील दुर्दैवी रेणुका गुंडरे हिने फोडला होता.
ही बातमी झी २४ तासने प्रसारित केली होती.
त्यानंतर रेणुकाला राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. यावेळी उदगीर-जळकोट मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तसेच राज्याचे पर्यावरण-पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनीही रेणुकाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. कोरोनातून बाहेर पडलेल्या राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आज जळकोट तालुक्यातील होकर्णा येथे जाऊन रेणुका गुंडरे हिची भेट घेतली.
यावेळी बनसोडे यांनी आई-वडिलांच्या छत्र हरविलेल्या रेणुकासह तिच्या दोन लहान बहिणींच्या शिक्षणाची ही जबाबदारी घेतली. सर्वप्रथम 'झी २४ तास' वर रेणुकाची बातमी प्रसारित झाल्यानंतर मुंबईत कोरोनामुळे उपचार घेत असतानाही राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी 'झी २४ तास'ला रेणुका गुंडरेच्या शिक्षणाच्या जबाबदारीचे आश्वासन दिले होते.
आपल्या मुलीने मोठं होऊन अधिकारी व्हावं अशी रेणुकाचा मयत आईची इच्छा होती. रेणुकाच्या आईची इच्छा पूर्ण त्यामुळे आज रेणुकाच्या घरी जाऊन राज्यमंत्री बनसोडे यांनी स्वतः रेणुकाला पुढील शिक्षणाची काळजी करु नको असे सांगितले.
यावेळी त्यांनी झी २४ तासच्या बातमीमुळेच आपल्याला हे समजल्याचे सांगण्यास ते विसरले नाहीत. स्वतः आपल्या भागाचे आमदार तथा राज्यमंत्री आपल्या घरी आल्यामुळे आई वडिलांचे छत्र हरवलेली रेणुका गुंडरेही गहिवरून गेली होती.
माझ्या मतदारसंघातील ही मुलगी माझी कुटुंबातील मुलगी मानतो. राज्यभरातून अनेकांनी मदत केली. आता मी मतदारसंघाचा आमदार म्हणून रेणुकासह तिच्या दोन्ही बहिणींच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन सर्व खर्च उचलेन अशा शब्दात संजय बनसोडे यांनी आश्वासन दिलंय.