मुंबई : काही दिवसांपूर्वी ट्विवटरच्या सीईओपदाची धुरा भारतीय वंशाचे पराग अग्रवाल यांच्याकडे आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा जगात भारतीयांचा डंका वाजला आहे.  आणि त्याचं कनेक्शन थेट कोल्हापूरशी आहे हे जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय वंशाच्या लीना नायर यांची फ्रान्समधील लग्झरी ग्रुप 'चॅनेल'च्या सीईओपदी नियुक्ती झाली आहे. चॅनेल प्रसिद्ध फॅशन कंपनी आहे. याआधी लीना नायर या एफएमसीजी कंपनी युनिलिव्हरसोबत काम करत होत्या. 


विशेष म्हणजे लीना नायर यांचे कोल्हापूरशी आणि सांगलीशी कनेक्शन आहे. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण कोल्हापुरातील होलिक्रॉस स्कूलमध्ये झाले आहे. त्यानंतर सांगलीच्या वालचंद कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींगचं शिक्षण पूर्ण केलं. 



पुढच्या शिक्षणासाठी त्या जमशेदपूरला गेल्या. तेथील झेव्हियर्स स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी सुवर्णपदक जिंकत एमबीएची पदवी घेतली. 1992 मध्ये लीना नायर युनिलिव्हरमध्ये रुजू झाल्या होत्या. मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काम करत करत 2016 मध्ये त्यांनी प्रमुख एचआर अधिकारी पदापर्यंत मजल मारली होती. युनिलिव्हरमध्ये त्या सर्वात कमी वयाच्या आणि पहिल्या आशियाई सीएचआरओ ठरल्या होत्या. 


लीना नायर फ्रान्सच्या दिग्गज कंपनीच्या सीईओ झाल्यानंतर पुन्हा एकदा जगात भारतीयांचा डंका वाजला आहे. काही दिवसांपूर्वी ट्विवटरच्या सीईओपदाची धुरा भारतीय वंशाचे पराग अग्रवाल यांच्याकडे आली होती. याशिवाय मायक्रोसॉफ्ट, गुगल, अडोब, आयबीएम यांसारख्या कंपन्यांचे सीईओ भारतीय आहेत. 


आता लीना नायर यांचाही समावेश या दिग्गजांच्या यादीत झाला आहे. चॅनेलच्या सीईओपदी नियुक्तीनंतर लीना नायर यांनी ट्विटरवर आभार मानले आहेत. माझा गौरव झाल्याचं वाटत आहे आणि चॅनेल सोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.  


जानेवारीमध्ये त्या नवीन कंपनीत रुजू होणार आहेत. चॅनेल ही कंपनी त्यांच्या क्विल्टेड हँडबॅग, ट्विड सूट आणि नंबर फाईव्ह परफ्युम या उत्पादनांसाठी ओळखली जाते. लीन नायर यांना फॉर्च्यून मासिकाच्या 2021 मधील पॉवरफूल भारतीय महिलांच्या यादीमध्ये स्थान मिळालं आहे. त्यांचं महाराष्ट्र कनेक्शन तरुणाईला प्रेरणा देणारं आहे.