गडचिरोली : जिल्ह्यातील कोरची तालुक्यात एक धक्कादायक घटना उजेडात आलीय. सोहेल गावी बिबट्याचा दीड वर्षीय बछडा आणि एका व्यक्तीची झटापट झाली. झटापटीत अशक्त बिबट्याचा मृत्यू झालाय. कोरची तालुक्यातील सोहले गावी एक लग्नसमारंभ होता. यात सहभागी होण्यासाठी आलेल्या जुमन कोरंगे नावाचा व्यक्ती शौचास जाण्यासाठी गावालगतच्या जंगलात निघाला. मात्र अचानक दाबा धरून असलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुमनने या हल्ल्याचा प्रतिकार केला. सुमारे १५ मिनिटे हा प्रकार सुरु होता. या दरम्यान अशक्त असलेल्या बिबट्याने बाजूच्या झाडीत आश्रय घेतला. जखमी जुमनने घटनास्थळावरुन पळ काढला आणि ग्रामस्थ तसंच वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचताच बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळला. तर जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.