VIDEO : नाशिकमध्ये भरवस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद, चौघे जखमी
नाशिकच्या सावकरनगरमधील भरवस्तीत शुक्रवारी सकाळी बिबट्या शिरल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली.
नाशिक - नाशिकच्या सावकरनगरमध्ये शुक्रवारी सकाळी दोन तास बिबट्याचा थरार बघायला मिळाला. अत्यंत चपळ असलेल्या या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चौघे जण जखमी झाले असून, त्यापैकी एक जण गंभीर असल्याची माहिती आहे. सावरकरनगरमधील माजी आमदार निशिगंधा मोगल यांच्या बंगल्यामध्ये बिबट्या शिरल्याचे शुक्रवारी सकाळी लक्षात आले. त्यानंतर तातडीने पोलिस आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळविण्यात आले. पण बघ्यांनी केलेल्या गर्दीमुळे बिबट्या बिथरला आणि इकडून तिकडे पळू लागला. यातच एकमागून एक करत त्याने चौघांवर हल्ला चढवला. अखेर साडेदहाच्या सुमारास वनविभागाचे कर्मचारी आणि स्थानिक तरुण यांनी जीव धोक्यात घालून बिबट्याला जेरबंद केले.
सावरकरनगरमधील माजी आमदारांच्या एक बंगल्यामध्ये बिबट्या शिरला होता. तो कसा आला, याची माहिती समजलेली नाही. पण ही घटना समजल्यावर वनविभागाचे कर्मचारी, पोलिस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. यानंतर बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू झाले. पण अंदाजे ८ ते १० वर्षांचा असलेला हा बिबट्या अत्यंत चपळ असल्याने तो वेगाने इकडून तिकडे पळून जात होता. यावेळी त्याने एकामागून एक चौघांवर हल्लाही चढवला. त्यामध्ये एका वृत्तवाहिनीचा कॅमेरामन जखमी झाला आहे. शिवसेना नगरसेवक संतोष गायकवाड, पत्रकार कपिल भास्कर, कॅमेरामन तबरेज शेख आणि वनरक्षक उत्तम पाटील अशी जखमी झालेल्या चौघांची नावे आहेत. बिबट्याने एकाच्या डाव्या पायाचा लचका तोडला आहे. या सर्वांवर उपचार करण्यात आले आहेत.
बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत होते. अखेर स्थानिक तरुण आणि वनविभागाचे कर्मचारी यांनी जीव धोक्यात घालून बिबट्याच्या अंगावर जाळी टाकली आणि त्याच्या हालचालींवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर त्याला मोठ्या प्रयत्नांने पिंजऱ्यामध्ये सोडण्यात आले आणि उपस्थित सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. सुमारे दोन ते अडीच तास परिसरात बिबट्याचा थरार सुरू होता. बिबट्या आल्याचे वृत्त नाशिकमध्ये वेगाने पसरल्याने अनेक नागरिकांनी सावरकरनगरमध्ये गर्दी केली होती.