दोषी शाळांना `धडा` तर परीक्षा केंद्रावर `लाल फुली, नेमकं काय म्हणाल्या शालेय शिक्षण मंत्री?
बारावी परीक्षेचा रसायनशास्त्र विभाग पेपर फुटीचे प्रकरण बाहेर आल्यानंतर शालेय शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आहे.
मुंबई : बारावी परीक्षेत पेपर फुटल्याच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तर, राज्यात आजपासून राज्यात दहावीची परीक्षा सुरु होत आहे या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत बुधवारी चर्चा उपस्थित करण्यात आली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची घोषणा केलीय.
विलेपार्ले येथे एका परीक्षा केंद्रावर बारावीच्या रसायनशास्त्राचा पेपर फुटल्याची घटना घडली. मात्र, पेपर फुटला नाही अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी सभागृहात दिली होती. परंतु, परीक्षा केंद्रांवर अशा घटना घडत असल्याचे वारंवार उघडकीस येत असल्याने या विषयावर चर्चा झाली.
राज्यात काही विविध परीक्षांच्या पेपर फुटीच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्या गोंधळ उडाला आहे. झाल्याने, त्यावरून गोंधळ उडत आहे. नोकरी भरतीच्या परीक्षात हा गोंधळ झाल्याने परीक्षा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली, अशी टीका करण्यात आली.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या चर्चेला उत्तर देताना, बारावीच्या परीक्षांचे पेपर फुटल्याच्या तक्रारी आल्यानंतर सर्व पातळ्यांवर चौकशी करण्यात येत आहे. कोणत्याही यंत्रणेने गाफील राहू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पेपर फुटी आणि कॉपीमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून प्रत्येक केंद्रात पुरेसे पोलिस बंदोबस्त राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.
पेपर फुटीच्या घटना घडल्यास शाळा व्यवस्थापनाला जबाबदार धरण्यात येईल. या प्रकरणात दोषी ठरलेल्या शाळांच्या परीक्षा केंद्रांवर 'लाल फुली' मारली जाईल. ते परीक्षा केंद्र बंद करण्यात येईल. पेपर फुटल्याच्या तक्रारी आल्यास, त्याची चौकशी करण्यात येईल. या चौकशीत संबधित शाळा दोषी आढळल्यास त्या शाळेची मान्यता काढण्यात येईल असा इशारा वर्षा गायकवाड यांनी दिला. या निर्णयाची काटेकोरपणे अमंलबजावणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.