पतीच्या निधनानंतर चार वर्षांच्या चिमुरडीला घरी ठेऊन `ती` बनली लेफ्टनंट
पती शहीद झाल्यानंतर आपल्या चिमुकलीचं कसं होईल? हा विचार न करता तिनं देशसेवेचं व्रत हाती घेण्याच ठरवलं आणि आता ती भारतीय सैन्य दलात अधिकारी आहे.
अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : पुण्यातल्या रेणुकास्वरुप शाळेत एक असा कार्यक्रम पार पडला की ज्यानं उपस्थित सारेच भारावून गेले. पती शहीद झाल्यानंतर आपल्या चिमुकलीचं कसं होईल? हा विचार न करता तिनं देशसेवेचं व्रत हाती घेण्याच ठरवलं आणि आता ती भारतीय सैन्य दलात अधिकारी आहे. अशा वीरांगणेला भेटण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शाळेच्या मुली जमल्या होत्या. यावेळी साऱ्यांनीच लेफ्टनंट प्रिया सेमवालला अनोखी मानवंदना दिली.
रेणुकास्वरुप शाळेच्या १२०० विद्यार्थिनींनी हातातले तिरंगे उंचावले... आणि दिली मानवंदना... त्यांची मानवंदना होती लेफ्टनंट प्रिया सेमवालला... लेफ्टनंट प्रिया सेमवाल यांचे पती कर्नल अमित सेमवाल पाच वर्षांपूर्वी शहीद झाली. अमित यांचं जाणं कुटुंबीयांसाठी मोठा आघात होता. पण अशाही कठीण परिस्थितीत आपल्या चार वर्षांच्या चिमुकलीचा विचार प्रिया यांनी बाजुला ठेवला आणि सैन्यात दाखल होण्याचं ठरवलं आणि आज त्या अधिकारी म्हणून रुजू झाल्यात.
महिला मुळातच सबळ असतात मग त्यांच्या सबलीकरणाची गरजच काय? असा थेट सवालच प्रिया यांनी उपस्थित केलाय. महिला पुरुषांपेक्षा कमी नाहीत याचंच प्रिया सेमवाल उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. महिलांसाठी आज करियरकरिता अनेक क्षेत्र आहेत पण त्यांनी सैन्यात असणं अनन्यसाधारण महत्त्व आहे.
रेणुकास्वरुप शाळेतल्या मुलींसोबत प्रिया यांनी यावेळी मनमोकळा संवाद साधला. त्यांचा प्रत्येक शब्द या मुलींसाठी प्रेरणादायीच आहे. लेफ्टनंट प्रिया यांच्याशी हात मिळवायला या मुली आतुर होत्या.
पतीच्या जाण्याचं दु:ख, चार वर्षांची चिमुकली हे सारे बाजुला सारून देशसेवेचं व्रत हाती घेण्याचा विचार करणंही एखाद्या सामान्य स्त्रीला कठीणचं... पण प्रिया यांनी ते करुन दाखवलं. म्हणूनच प्रिया यांना पुण्यातल्या सैनिक मित्र परिवारनं या कार्यक्रमात बोलावलं होतं. या कार्यक्रमात आलेला प्रत्येक जण भारावून गेलेला... प्रिया यांच्यासारख्या अनेक महिला आज सैन्य दलात कार्यरत आहेत. समाजासमोर त्या आदर्श... आणि म्हणूनच या महिलांना आमचा सलाम...