चंद्रशेखर भुयार, झी २४ तास, अंबरनाथ : अंबरनाथमधील महावितरणाद्वारे ग्राहकांच्या वीज मीटरचं रिडिंग घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या एजन्सीचा बेजबाबदारपणाचा नमुना दिसून आलाय. अंबरनाथ पूर्व भागातील कानसई परिसरात एका इमारतीतील 'कुत्र्याच्या भीतीमुळे रिडींग न झाल्यास आमची जबाबदारी नाही' असा संदेशच एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी चक्क वीज मीटरच्या बॉक्सवर लिहिल्याचा अजब प्रकार समोर आलाय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महावितरणाचे मीटर रिडींग घेणारे कर्मचारी कुत्र्यांमुळे धास्तावल्याचं पाहायला मिळतंय. याचं कारण म्हणजे, अंबरनाथच्या एका इमारतीच्या मीटर बॉक्सवर या कर्मचाऱ्यांनी तसा संदेशच लिहिलाय. 'कुत्र्यामुळे रिडींग न आल्यास आमची जबाबदारी नाही' असा संदेश अंबरनाथच्या कानसई भागातील मनिषा इमारतीच्या मीटर बॉक्सवर लिहिण्यात आलाय. भटक्या कुत्र्यांची ही समस्या अनेक ठिकाणी भेडसावत असल्याचं कंत्राटी कर्मचाऱ्यांचं म्हणण आहे. 


ज्या इमारतीत हा प्रकार घडलाय, तिथल्या रहिवाशांनी मात्र या सगळ्याला कामचुकारपणाचं नाव दिलंय. तसंच आता अंदाजपंचे दिलेल्या रिडींगच्या आधारे आम्हाला जर जास्त बिल आलं तर आम्ही ते भरणार नसल्याचं मुकेश रहिवाशांनी स्पष्ट केलंय.



याबाबत महावितरणाच्या अधिकऱ्यांना विचारणा केली असता, सदर प्रकार अतिशय दुदैवी असल्याने सांगत संबंधित एजन्सीला नोटीस पाठवून त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंते अशोक सावंत यांनी म्हटलंय. 


यापूर्वीही एकदा अंबरनाथमध्येच कुत्र्यामुळे मीटर रिडींग घेता न आल्यानं विजबिलावर मीटरऐवजी चक्क कुत्र्याचाच फोटो छापण्यात आल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे श्वानप्रेमापोटी उद्या तुमच्याही वीजबिलावर कुत्र्याचा फोटो छापून आला, तर नवल वाटून घेऊ नका... तेव्हा आता पालिका कर्मचारी या कुत्र्यांचा बंदोबस्त करणार का? हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.