मुंबई : राज्यातील रस्त्याबाबत अनेक तक्रारी आपण पाहिल्या असतील. काही ठिकाणी रस्त्याची चाळण झालेली पाहायला मिळाली आहे. तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, अशीही परिस्थिती पाहली असेल. मात्र, आज अशी एक गोष्ट घडली आहे की, चक्क लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये रस्त्याची नोंद झाली आहे. राज्य मार्ग क्र. 147 वर सलग 24 तास काम करुन तब्बल 39.69 किलोमीटर लांबीच्या एक लेन रस्त्याचे बिटुमिनस काँक्रिटीकरणाचे काम केले आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या या कामगिरीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही नोंद घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सार्वजनिक बांधकाम विभागाने सातारा जिल्ह्यात राज्य मार्ग क्र. 147 वर सलग 24 तास काम करुन तब्बल 39.69 किलोमीटर लांबीच्या एक लेन रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम केले आहे. सलग 24 तास काम करून एका बाजूचा रस्ता पूर्ण करण्याचा विक्रम करून सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रकल्पाचे काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी  महाराष्ट्राचा, देशाचा मान वाढविला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे  कौतुक करुन अभिनंदन केले आहे.


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सातारा विभागामार्फत सध्या सातारा जिल्ह्यामध्ये राज्य मार्ग क्र. 147 फलटण ते म्हासुर्णे या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे.  रविवार, 30 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते आज सकाळी 7 वाजेपर्यंत सलग 24 तास काम करून तब्बल 39.69  किलोमीटर लांबीच्या एका लेनचे बिटुमिनस काँक्रिट रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. 24 तासांत सुमारे 40 किलोमीटरचा एका बाजूचा रस्ता पूर्ण करण्याचा हा एक विक्रम आहे.


कोरोनाच्या या काळामध्ये अनेक अडचणी असताना बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि या प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीचे अभियंते, कर्मचारी व कामगारांनी केलेली ही कामगिरी नक्कीच आनंददायी, प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. त्यासाठी मी संपूर्ण यंत्रणेचे मनापासून अभिनंदन करतो. आपण सर्वांनी महाराष्ट्राचा, देशाचा मान वाढवला आहे, असे कौतुक अशोक चव्हाण यांनी केले आहे.