चंद्रपूर : दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस कर्मचारीच पोलिसांच्या वाहनात दारू तस्करी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला पोलीस कर्मचारी सचिन मेश्राम हा नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन मध्ये चालक पदावर कार्यरत आहे. मेश्राम पोलिसांच्या वाहनाचा वापर करून चंद्रपुरात दारू तस्करी करत असल्याचं पुढे आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१४ मार्च रोजी  चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने चिचपल्ली भागात ससीम कांबळे या दारू तस्कराला त्याच्या ३ साथीदारांसह अटक केली होती. ससीम कांबळेच्या गाडीतून पोलिसांनी ८ लाख रुपये किमतीची ८० पेट्या दारू जप्त केली होती. मात्र या आरोपींनी पोलिसांकडे दिलेला कबुलीजबाब अतिशय धक्कादायक होता. 


आरोपींनी दिलेल्या माहिती प्रमाणे रामटेक पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सचिन मेश्राम हा कर्मचारी पोलिसांच्या वाहनातच दारू भरून त्यांना चंद्रपुरात आणून द्यायचा. या प्रकरणात सचिन मेश्रामला रामटेक मधून अटक करण्यात आली असून आज त्याला कोर्टात नेण्यात येणार आहे. या प्रकरणात चंद्रपूर पोलीस दलातील अधिका-यांनी मौन बाळगले आहे.