आशीष अम्बाडे, चंद्रपूर, झी मीडिया :  केस कापतानाच्या बाळाचा  व्हिडिओ सोशल मीडियावरील व्हायरल होत आहे. चंद्रपूरच्या ४ वर्षीय अनुश्रुत पेटकरचा व्हिडीओ लाखो लोकांनी  शेअर केलाय.  घरी लहान बाळाचे केस कापताना त्याचा चिमुकला राग आपल्या कॅमेऱ्यात कैद केलाय. चंद्रपूरच्या अनुप पेटकर यांनी आपल्या मुलाचा व्हिडिओ कॅमेराबद्ध केलाय. हाच व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालत आहे. एकीकडे हेअर ड्रेसरला मार देण्याच्या धमक्या तर दुसरीकडे आपले केस कापले जात असल्याचा प्रचंड राग व्हिडिओतून व्यक्त होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर एका बाळाचा केस कापतानाचा त्याच्या वडिलांनी काढलेला व्हिडिओ धमाल करत आहे. आपले केस कापले जात असतानाचा त्याचा राग आणि लहानग्याची हतबलता या व्हिडिओतून निरागसपणे पुढे आली आहे. झी मीडियानं हे बाळं आणि त्याच कुटुंब शोधून काढत त्यांना बोलतं केलं. आपल्या सर्वांच्या घरी बाळाच्या पहिल्या-दुसऱ्या खेपेस केस कापतानाचा अनुभव काहीसा असाच आहे. अनुश्रुत पेटकर असे या बाळाचं नाव आहे. 



चंद्रपूर शहरातील कोळसा खाणींचा भाग असलेल्या रय्यतवारी कॉलरी परिसरातील खाण कामगारांच्या वसाहतीत आपल्या कुटुंबासह राहणारा अनुश्रुत पेटकर सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याचं कारण आहे त्याचे वडील अनुप पेटकर यांनी त्याचा काढलेला एक व्हिडिओ. या व्हिडिओत या बाळाचे केस कापताना त्याला आलेला राग- त्याची हतबलता आणि गोबऱ्या गालामध्ये ठासून भरलेली निरागसता याचा सुरेख संगम झालाय.


हा व्हिडीओ सुमारे तीन महिन्यांपूर्वीचा आहे. गेले काही दिवस सोशल मीडियावरील या व्हिडिओला लाखो नेटक-यांनी हातोहात प्रतिसाद दिलाय. हजारो कॉमेंट्स -लाखो शेअर करत नेटक-यांनी या गोबऱ्या गालाच्या अनुश्रुतचे कौतुक केले आहे. अनुप पेटकर आणि श्रुती पेटकर यांचा हा मुलगा सध्या आपल्या आजोळी चंद्रपुरात आलेला आहे. त्याचे आई-वडील संगणक शिक्षण व्यवसायात नागपुरात कार्यरत आहेत. गोबऱ्या गालाच्या अनुश्रुतचे घरच्यांनी याआधीही अनेक व्हिडिओ तयार केलेत. मात्र चंद्रपुरात आल्यानंतर त्याचे केस कापताना त्याने दाखविलेला लटका राग आणि थेट हेअर ड्रेसरलाच मारण्याची दिलेली गोड धमकी यामुळे नेटकरी या बाळाच्या जणू प्रेमातच पडलेत.


चार वर्षाचा अनुश्रुत भलताच खोडकर आहे. त्याच्या आईला त्याचे लाड पुरवताना दिवस कसा निघून जातो हेही कळत नाही. इतक्या खोडकर आणि सक्रीय बाळाला कोरोना काळात एका ठिकाणी बसवून ठेवणे जिकिरीचे काम. मात्र भरपूर खेळणी आणि गप्पा सांगून सध्या बाळाला संकटापासून दूर ठेवले जात आहे. हा व्हिडीओ काढला जाताना त्याचे हावभाव बघून आईने त्याचा व्हिडिओ घेण्याची सूचना केली. मात्र सोशल मीडियावर अपलोड केलेल्या व्हिडिओला असा उदंड प्रतिसाद मिळेल अशी कल्पनाही त्याने केली नव्हती. लोकांनी आपल्या घरातील बाळाच्या पहिल्या केस कापण्याच्या प्रसंगाशी हा व्हिडिओ जोडत त्याचा आनंद घेतल्याने हा व्हिडिओ चर्चेत आल्याचे त्यांचे मत आहे.


अनुश्रुतच्या या व्हिडिओ मागे असलेले खरे हात आहेत ते चंद्रपुरातील त्याच्या घराजवळ असलेल्या हेअर ड्रेसर सुनील सविता चे. सुनील दोन पिढ्यांपासून पेटकर परिवाराच्या हेयर ड्रेसिंगची साथ देत आहेत. लहानग्या अनुश्रुतचे केस कापायचे म्हणून सुनील आनंदात घरी पोचला. मात्र या ४ वर्षाच्या गोडुल्याच्या गोड धमक्या ऐकुन त्याची हसून हसून पुरेवाट झाली. एकीकडे व्हिडिओ चित्रीकरण दुसरीकडे त्याचे लक्ष वळविण्यासाठी केल्या जाणाऱ्या गप्पा यातच सुनील आपले काम आनंद घेत लीलया पार पाडत होता. आज अनुश्रुतचा व्हिडीओ वायरल झाल्याचे पाहून त्यालाही आनंद झालाय. 


सोशल मीडिया म्हणजे वाद-विवाद. सोशल मीडिया म्हणजे हिंसेला प्रोत्साहन देणारी जागा. सोशल मीडिया म्हणजे नकारात्मकता. सोशल मीडिया म्हणजे वायफळ गप्पांचा फड. या सर्व बाबी दूर सारत लाखो नेटकरी जगण्याचा निखळ आनंद शोधत या प्लॅटफॉर्मवर सक्रिय असतात हेही तेवढेच खरे. अन्यथा अनुश्रुतची निरागसता नकारात्मकतेच्या महापुरात हरवली असती. मात्र तसे झाले नसल्याने आशेचा किरण शिल्लक असल्याचे सिद्ध झाले आहे.