Loksabha Election 2024 Live Updates: नाव न घेता नरेंद्र मोदींची शरद पवारांवर टीका, म्हणाले...

Mon, 29 Apr 2024-8:12 pm,

Loksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज महाराष्ट्रात एकूण 3 सभा होणार आहेत. राज्यात होत असलेल्या या सभांमध्ये पंतप्रधान मोदी नक्की काय बोलणार याकडे सर्वच पक्षांचं लक्ष लागून राहिलं आहे. दिवसभरातील राजकीय घडामोडी पाहा संक्षिप्त स्वरुपात...

Loksabha Election 2024 Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारसभांचा धडाका आजपासून महाराष्ट्रात सुरु होत असून पुढील 2 दिवसांमध्ये पंतप्रधान राज्यात तब्बल 6 मतदरासंघांमध्ये सभा घेणार आहेत. तर दुसरीकडे आज अनेक उमेदवार आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. दिवसभरातील वेगवेगळ्या राजकीय घडामोडींवर आपण या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून नजर टाकणार आहोत...

Latest Updates

  • नाव न घेता नरेंद्र मोदींची शरद पवारांवर टीका

    महाराष्ट्रातल्या एका नेत्यामुळे राजकारण अस्थिर झालं आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. 1995 च्या आघाडी सरकारलाही अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता आणि 2019 मध्ये या आत्म्याने जनादेशाचा अपमान केला होता, अशी टीका मोदींनी केली आहे. 

  • अहमदनगर लोकसभा मतदारसंघात आता समीकरणं बदलत चालली आहेत. एकीकडे सुजय विखे पाटील आणि दुसरीकडे निलेश लंके यांच्यात प्रमुख लढत असताना आता निलेश लंके यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एमआयएमचे उमेदवार परवेज अशरफी यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. अखेरच्या दिवशी त्यांनी अर्ज मागे घेतला अन् नगरच्या निवडणुकीत ट्विस्ट निर्माण झालाय. मुस्लिम समाजातून होत असलेल्या विरोधामुळे त्यांनी उमेदवारी मागे घेतल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

  • ओबीसींसाठी नगरमध्ये बॅनर! मफलर घातलेला नेत्याचा फोटो; पोस्टर हटवले

  • अमोल कीर्तिकरांविरोधात रविंद्र वायकर लढणार - सूत्र

  • विकासाच्या गॅरंटीवर मत मागायला आलोय; मोदींचं सोलापूरकरांना आवाहन

    2024 मध्ये दोनदा सोलापूरमध्ये आलो, म्हणत पंतप्रधान मोदींनी सोलापूरमधील सभेच्या भाषणाला केली सुरुवात. मराठीमध्ये मोदींनी भाषणाला सुरुवात केली. मी तुमचा आशीर्वाद मागायला आलो आहे. जानेवारी महिन्यात मी तुम्हाला देण्यासाठी आलो होतो. आज मी विकासाच्या गॅरंटीवर मत मागतोय, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

  • नाशिकमधून शिंदे गटाचं धक्कातंत्र! शांतिगिरी महाराजांनी भरला अर्ज

    नाशिकमधून कोणाला उमेदवारी दिली जाणार यासंदर्भातील चर्चांना पूर्णविराम लागला आहे. नाशिकमधून शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. राज्यातील 13 ते 14 जिल्ह्यांमध्ये बाबांचा मोठा अनुयायी वर्ग आहे.

  • उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सिद्धीविनायकाचं दर्शन

    उमेदवारी अर्ज भरायला जाण्यापूर्वी ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांनी सिद्धीविनायकांचे घेतले दर्शन. यावेळेस अनिल देसाईही त्यांच्याबरोबर होते.

  • 'राहुल गांधींनी लग्न केलं नाही तर आता त्यांचं...'; जाहीर प्रचारसभेत मोदींच्या मंत्र्यांचं विधान

    काँग्रेसने लोकसभा 2024 च्या निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यापासून संपत्तीच्या फेरवाटपाच्या मुद्द्यावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. या मुद्द्यावरुन भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. असं असतानाच आता केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी अविवाहित असल्याच्या मुद्द्यावरुन ठाकूर यांनी केलेलं विधान सध्या चर्चेत आहे. येथे क्लिक करुन वाचा ठाकूर नेमकं काय म्हणाले

  • उद्धव ठाकरेंची प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी सभा

    सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे सोलापुरात जाहीर सभा घेणार आहेत. संध्याकाळी सात वाजता कर्णिक नगर ग्राउंड इथे ही जाहीर सभा होणार आहे. सभेनंतर उद्धव ठाकरे सुशीलकुमार शिंदेंच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी जाणार आहेत.

  • मुंबईत शेवाळे भरणार अर्ज; सीएम राहणार उपस्थित

    मुंबईत दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे आज उमेदवारी अर्ज दाखल करतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यावेळी उपस्थित राहणार आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत आणि अनिल देसाईही आज उमेदवारी अर्ज दाखल करतील. शक्तिप्रदर्शन करण्यासाठी फोर्टच्या बाळासाहेब ठाकरे पुतळ्यापासून ते रॅली काढणार आहेत.

  • ठाण्यात आदित्य ठाकरेंच्या उपस्थित विचारे भरणार अर्ज

    आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत आज ठाण्यात मविआचे उमेदवार राजन विचारे अर्ज भरतील. ते आज रोड शो करून शक्तिप्रदर्शन करणार आहेत. येथील महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही.

  • नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे भरणार अर्ज; राऊत राहणार उपस्थित

    नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. रामकुंडावरून रॅली काढत ते शक्तिप्रदर्शन करणार आहेत.  तर मविआचे उमेदवार राजाभाऊ वाजेही आज अर्ज भरतील. यावेळी संजय राऊत उपस्थित असणारेत. नाशिकमध्ये अजून महायुतीचा उमेदवारच ठरलेला नाही.

  • अनेकजण भरणार अर्ज

    महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यासाठी आज अर्ज भरण्याचा दिवस आहे. धुळे, नाशिक, ठाणे, मुंबईतले उमेदवार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करतील. धुळ्यात भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे उपस्थित असतील. धुळ्यातले वंचितचे उमेदवार अब्दुल रहमानही अर्ज भरतील. धुळ्यात भामरे आणि रहमान यांची लढत काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांच्याशी होतेय.

  • पवारांची दुसरी सभा फलटणमध्ये

    शरद पवारांची आजची दुसरी सभा संध्याकाळी 6 वाजता फलटणमध्ये होणार आहे. मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

  • वाईमध्ये शरद पवारांची सभा

    सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी आज शरद पवारांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. वाई इथे संध्याकाळी 4 वाजता होणा-या या सभेला शरद पवार संबोधित करणार आहेत.

     

  • पुणे, मावळ, बारामती, शिरुरच्या उमेदवारासाठीही मोदी करणार प्रचार

    पुण्याचे माजी महापौर आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, मावळचे श्रीरंग बारणे, बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी हडपसरमधील रेसकोर्स मैदानावर संध्याकाळी पावणेसहा वाजता मोदी सभा घेणार आहेत.

  • मोदी करणार उदयनराजेंचा प्रचार

    लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 3 सभा महाराष्ट्रात होत आहेत. सोलापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाछी दुपरी दीड वाजता होम मैदान येथे सभा घेतली. तर उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी कराड येथे मोदी दुपारी पावणेचार वाजता सभा घेतील. 

  • 'मोदी सरकारच्या महाराष्ट्र द्वेषाची यादी न संपणारी'; ठाकरे गट म्हणतो, 'गुजरातला वेगळा..'

    कांदा निर्यातीच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर निशाणा साधला आहे. "केंद्रातील मोदी सरकारला अखेर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपुढे झुकावेच लागले. महाराष्ट्राची कांदा निर्यातबंदी उठविणे भाग पडले आहे. त्यावरून सत्तापक्ष स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. मोदी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ‘गिफ्ट’ दिले, अशा पिपाण्या वाजवीत आहे. मात्र हे गिफ्ट वगैरे काही नाही. महाराष्ट्रातील जनक्षोभासमोर मोदी सरकारने घातलेली शेपूट आहे," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त...

  • मोदींच्या आगामी सभा कुठे?

    उद्या म्हणजेच 30 एप्रिल रोजी माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये पंतप्रधान मोदींच्या प्रचारसभा होणार आहेत. तर 6 आणि 10 मे रोजी देखील मोदी राज्यात प्रचारसभा घेणार आहेत. 6 मे रोजी बीडमध्ये पंकजा मुंडेंसाठी मोदी मैदानात उतरतील. 10 मे रोजी कल्याणसहीत नगर आणि दिंडोरीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधानांच्या सभा होतील.

  • मोदींच्या आजच्या सभा कुठे?

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरामध्ये सभांचा धडाका लावला आहे. मात्र त्यातही मोदींचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पूर्व विदर्भातल्या 5 जागांसाठी मतदान पार पडलं. यात मोदींनी चंद्रपूर, रामटेक आणि वर्ध्यात सभा घेतल्या. दुस-या टप्प्यासाठी मोदींनी नांदेड, परभणी, अमरावतीत सभा घेतल्या. आता त्यांचं लक्ष राज्यातल्या उर्वरित तीन टप्प्यातल्या मतदानाकडे आहे. त्यासाठी आज त्यांच्या पुणे, सोलापूर आणि साता-यात सभा होतायत.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link