Maharashtra Breaking News Live : महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांचीही तपासणी झाली पाहिजे- आदित्य ठाकरे

Mon, 11 Nov 2024-7:35 pm,

Maharashtra Breaking News Live Updates : आगामी विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Maharashtra Breaking News Live Updates : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून, आता मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्याच धर्तीवर राज्यात बरीच राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत. कसे होतायत हे बदल, कोण आहे या बदलांचा सूत्रधार? पाहा सर्व अपडेट, एका क्लिकवर... 


Latest Updates

  • महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांचीही तपासणी झाली पाहिजे- आदित्य ठाकरे 

    आज वणी येथे उद्धव ठाकरेंच्या सामानाची तपासणी करण्यात आली. यावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जे कायद्याला धरुन ते झालंच पाहिजे! पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून जो समानतेचा हक्क भारतीयांना दिलाय, तो सगळ्यांना लागू व्हायला हवा! कायदा सगळ्यांना समान हवा!', असे ते म्हणाले. महाराष्ट्रात येणाऱ्या दिल्लीश्वरांची आणि राज्याला लुटणाऱ्या मिंधेंचीही तपासणी व्हायला हवी! होऊन जाऊ दे 'दूध का दूध और पानी का पानी!', असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

  • मोदी आणि शहांची बॅगसुद्धा चेक करा- उद्धव ठाकरे

    यवतमाळ जिल्ह्यातील वणीला हेलिकॉप्टरने पोचल्यावर उद्धव ठाकरेंची  बॅग तपासण्यात आली. यावर उद्धव ठाकरे यांनी वाशिम येथील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलतांना म्हणाले की, ज्याप्रमाणे आचार संहिता आम्हालाचं लागू का? ज्याप्रमाणे माझी बॅक तपासली त्याप्रमाणे मोदी,शहा, देवेंद्र,अजित पवार यांच्या बॅग तपासल्या पाहिजे.ही हिम्मत दाखवावी.तर मोदी,शहाच्या बॅगा येताना नाही तर जाताना तपासल्या पाहिजेत असं उद्धव ठाकरे वाशिम येथील प्रचार सभेत बोलताना म्हणाले.

  • माळशिरसमध्ये लक्ष्मण हाकेंना विरोध

    माळशिरस विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर यांनी लक्ष्मण हाकेंच्या मराठा विरोधी ओबीसी आंदोलनाला तीन लाख रुपयांची मदत केली होती. उत्तम जानकर यांच्या प्रचारासाठी ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके येणार आहेत. हाके जर उघडपणे जानकर यांचा प्रचार करणार असतील तर मराठा समाज उत्तम जानकर यांना पराभूत करण्याची भूमिका या निवडणुकीत घेईल असा इशारा मराठा समाजाच्या आंदोलकांनी दिला आहे.

  • महायुतीकडून मुंगेरीलालचे हसीन सपने... - छत्रपती संभाजी राजे 

    भारतीय जनता पार्टी कडून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून समोर केला जात आहे यावर जनस्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी फडणवीसांना चिमटा घेतलाय . ते म्हणाले अजून निवडणूक व्हायची आहे निकाल लागायचा आहे मात्र महायुतीकडून मुगेरी लालचे हसीन सपने पाहायला जात आहे.  जनस्वराज्य पक्षाचे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्या प्रचारार्थ  छत्रपती संभाजी राजे तळ ठोकून आहेत. यावेळी आज सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. प्रस्थापितांना दूर करून विस्थापितांना संधी द्या असे आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केले.

  • आगरी कोळी सेनेचा बहुजन विकास आघाडीला पाठींबा

    पालघर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांचा प्रचार तेजीत येत असतानाच, विविध पक्ष आणि संघटनांकडून काही मातब्बर उमेदवारांना समर्थन आणि पाठिंबा देण्याच्या राजकारणात जोर आला आहे. जिल्ह्यातील बहुजन विकास आघाडी या प्रमुख पक्षास ठाणे आणि पालघर जिल्ह्यात प्रभाव असलेल्या आगरी कोळी सेनेने आज विनाशर्थ पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे.

  • राहुल गांधी उद्या मंगळवारी महाराष्ट्र दौऱ्यावर

    लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या मंगळवारी महाराष्ट्र दौ-यावर आहेत. दुपारी 12 वाजता ते चिखली येथे चिखलीचे काँग्रेस उमेदवार राहुल बोंद्रे आणि खामगावचे उमेदवार राणा दिलीप सानंदा यांच्यासाठी प्रचारसभा घेणार आहेत. दुपारी 3.30 वा. गोंदिया विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार गोपाल अग्रवाल यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत. 

  • संजय राऊतांकडून व्यापा-यांचा अपमान?

    संजय राऊतांकडून व्यापा-यांचा अपमान? माध्यमांशी संवाद साधताना केलेल्या वक्तव्यामुळं राऊत अडचणीत येण्याची शक्यता. व्यापारी भेसळखोर असल्याचा राऊतांचा आरोप. व्यापारी खोटे बोलत असल्याचा आरोप. शाहांवर टीकेच्या नादात व्यापा-यांचा अपमान? नव्या वादाला फुटली वाचा... 

  • संधी मिळाली तर मुख्यमंत्री व्हायला आवडेल - रामदास आठवले 

    'मला मुख्यमंत्री व्हायचे झाले तर माझे वरचे राज्यमंत्री पद जाईल. सध्या राज्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये चढाओढ सुरु आहे. पण त्यातून मला संधी मिळाली तर मुख्यमंत्री व्हायला आवडेल', असं विधान रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी हे विधान केलं. 

     

  • नागपुरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर धान्याचे (रेशन) किट सापडले

    नागपुरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर धान्याचे (रेशन) किट सापडून आले आहे. काल रात्री मोतीबाग रेल्वे कॉलनी मध्ये 220 किट सापडून आल्यानंतर रात्री उशिरा पश्चिम नागपूरमधील महेंद्र नगर परिसरातील अमन प्राइड सोसायटीमध्ये तब्बल 2500 रेशनकिट सापडून आल्याने खळबळ माजली आहे. 

  • संजय राऊतांनी अमित शहांना सुनावले खडे बोल 

    'या महाराष्ट्रात जो चिखल केलेला आहे राजकारणाचा त्याला जबाबदार अमित शहा आणि त्यांची व्यापारी वृत्ती. महाराष्ट्र लुटण्यासाठी महाराष्ट्राच्या मराठी माणसाला कंगाल करण्यासाठी जे षडयंत्र रचलं आहे त्यामुळे महाराष्ट्राचा हा चिखल झालेला आहे', असं राऊत मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. 

     

  • काकांसोबत लढतांना दडपण नाही वाईट वाटतं- युगेंद्र पवार 

    बारामतीत अजित पवारांच्या विरोधात उभ्या असणाऱ्या श्रीनिवास पवार यांचे सुपूत्र, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी निवडणुकीच्या धर्तीवर लक्षवेधी वक्तव्य केलं. 'काकांसोबत लढतांना दडपण नाही, वाईट वाटतं', असं म्हणत कोणत्याही कुटुंबात अशा गोष्टी होऊ नयेत असं स्पष्ट म्हटलं. 
    आम्ही कुठेच गेलो नाही, साहेबांना साथ देण्यासाठी तिथेच आहोत असं म्हणताना लोकसभेची पुनरावृत्ती होईल असे संकेत दिले. आपण अजित पवारांपेक्षा वयानं लहान असल्यानं त्यांच्याविषयी बोलणार नाही अशा शब्दांत आपली भूमिका मांडताना आपण कोणाला विरोध करण्यासाठी नाही तर पवार साहेबांना साथ देण्यासाठी इथं आहोत असं ते म्हणाले. 

     

  • धनंजय मुंडे यांनी कमळच हाती घेतलं असतं तर बरं झालं असतं ....

    तुमच्या डोक्यात कमळाची सवय आहे, मात्र कमळाला समोर धरा आणि घड्याळाचं बटण दाबा, धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते गेले होते मात्र त्या अगोदर कमळ दाबत होते. आता वाटतंय धनंजय मुंडे यांनी कमळच घेतलं असतं तर बरं झालं असतं. मी तर तयार आहे मात्र एका बाजूला सगळी शक्ती जायला नको असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपण जरी भाजपचे कार्यकर्ते असलो तरी धनंजय मुंडे यांचे चिन्ह घड्याळ आहे आणि घड्याळाला मतदान करण्याचं आवाहन केलं. 

  • पुण्यात आज होम वोटिंग प्रक्रिया सुरू 

    विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर पुण्यात आज होम वोटिंग प्रक्रिया सुरू झाली आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी ही मतदान प्रक्रिया घरी जाऊन सुरू करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी आणि पोलीस यांच्या उपस्थितीत ही मतदान प्रक्रिया सुरू आहे. 

  • पुणेकरांच्या परदेशवाऱ्या वाढल्या

    एप्रिल ते सप्टेंबर 2024-25 या सहा महिन्यांच्या काळात तब्बल 92 हजार 691 प्रवाशांनी पुण्यातून केला बाहेर देशात प्रवास. 2023-24 च्या सहा महिन्यात 82 हजार 293 प्रवाशांनी प्रवास केला होता. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 10000 पेक्षा अधिक जास्ती प्रवाशांनी केला आंतरराष्ट्रीय प्रवास. प्रवाशांची संख्या वाढली मात्र पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीची संख्या कमीच. 

  • परभणी जिंतूर मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजय भांबळे यांना धक्का

    परभणीच्या जिंतूर मध्ये परंपरागत राजकीय लढत रंगली असून विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांना धक्का दिलाय. भांबळे यांचे निष्ठावान युवा जिल्हा प्रमुख धिरज भैय्या कदम यांच्यासह देऊळगाव गात येथील शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नेर्तुत्वावर विश्वास ठेवत भाजपमध्ये प्रवेश केला. 

  • परळीमध्ये निवडणुकच वाटत नाही त्यामुळे..., असं का म्हणाल्या पंकजा मुंडे? 

    परळी मध्ये काही निवडणुकीचं वातावरण वाटत नाही भोंगे नाही काही नाही तूच दोन-चार भोंगे लाव तुतारीचे ऐकायला. आपणच जाऊन चार तुतारीचे भोंगे लावले पाहिजेत मग इलेक्शन वाटेल आणि आपले कार्यकर्ते खडबडून जागे होतील असं म्हणत थेट तुतारीचे भोंगे लावण्याचा अजब सल्ला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना दिला पंकजा मुंडेंच्या पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य करतात चांगलाच हशा पिकला. निवडणुकीचा फॉर्म भरल्यानंतर पंकजा मुंडे धनंजय मुंडे एकत्रित दीपावली स्नेह मिल कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करत होत्या. 

  • बेळगावत भरतीसाठी आलेल्या युवकांवर लाठी चार्ज

    बेळगावमध्ये प्रादेशिक सेनेसाठी भरती सुरू असून यासाठी मराठा लाईफ इन्फंट्री सेंटर मधील मैदानावर युवकांनी तोबा गर्दी केली होती. जवळपास 30 हजाराहून अधिक युवक भरतीसाठी दाखल झाल्याने प्रशासनाला गर्दीवर नियंत्रण मिळविणे अवघड झाले होते. त्यामुळे पोलीस आणि बंदोबस्तासाठी आलेल्या जवानांना या युवकांवर लाठीमार करावा लागला. यामध्ये चेंगराचेंगरी होऊन दोन युवक जखमी झाले. प्रादेशिक सेनेच्या 106 प्यारा, 115 महार,. 125 दि गार्ड्स इन्फंट्री बटालियन मधील सैनिकांच्या 257 व क्लार्कच्या 53 जागांसाठी बेळगावात अखिल भारतीय मेळावा सुरू आहे. मराठा लाईफ इन्फंट्री च्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूलच्या मैदानावर ही भरती सुरु आहे.

  • कार्तिकी एकादशीच्या वाटेत आचारसंहितेचा अडसर

    कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उप मुख्यमंत्र्यांनी करण्यास आचारसंहितेचा अडसर. श्री विठ्ठल रुक्मिणी यांची उद्या पहाटेची कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा राज्याच्या मुख्य सचिव यांच्या हस्ते होण्याची शक्यता. आज विधी व न्याय विभाग कडून मंदिर समिती कडे त्यांबाबत सूचना येणार. 

  • श्रीवर्धनमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का

    रायगडच्या श्रीवर्धन मतदार संघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे निकटवर्ती श्यामकांत भोकरे यांची पक्षाला सोडचिठ्ठी. भोकरे माजी जिल्हा परिषद सदस्य असून पक्षाचे मुख्य जिल्हा प्रवक्ते आहेत. ते लवकरच तुतारी हाती घेणार आहेत. पक्षांतर्गत गट बाजीला कंटाळून भोकरे यांचा राष्ट्रवादीला रामराम. श्यामकांत भोकरे यांना थेट शरद पवार यांचा फोन, पवारांच्या फोनमुळे भारावून गेल्याचे त्यांनी सांगितलं. येत्या 14 तारखेला पुण्यातील मोतीबाग इथं शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. 

  • अपक्ष उमेदवार उभा करून मते खाण्याचा भाजपचा नवा ट्रेंड- जयंत पाटील 

    महाविकास आघाडी उमेदवार अश्विनी कदम यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची जाहीर सभा. 
    अपक्ष उमेदवार उभा करून मते खाण्याचा भाजपचा नवा ट्रेंड असल्याचं म्हणत हा पक्ष हरियाणा पॅटर्न राबवत असल्याचा आरोप त्यांनी केला. पर्वतीत विद्यमान आमदार भाजप नगरसेवकांची कामे दाखवून श्रेय लाटतात, हीच खरी निष्क्रियता… म्हणत जयंत पाटील यांची माधुरी मिसाळ यांच्यावर टीका आणि भाजपवर हल्लाबोल. 

  • पुण्यातील वाहतुकीत बदल... 

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्याच्या पुणे दौऱ्यानिमित्त पुणे शहरातील वाहतूक सेवा बंद असणाऱ्या तर काही ठिकाणी बदल करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांची उद्या  पुण्यातील स प महाविद्यालयात सभा होणार आहे  त्या अनुषंगाने  शहरातील वाहतूक सेवेत बदल करण्यात आले. 
    गरुड गणपती चौक ते भिडे पूल... झेड ब्रिज जंक्शन प्रवेश बंद राहणार आहे. तर डेक्कन बाजूने भिडे पूल मार्गे येणाऱ्या वाहनांना सरळ केळकर रोड कडे प्रवेश बंद असणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर कराव्या अशा सूचना पुणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. 

     

  • सुप्रिया सुळे आज पुणे, पिंपरी चिंचवडच्या दौ-यावर 

    खासदार सुप्रिया सुळे आज पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या दौ-यावर आहेत. भोसरीचे उमेदवार अजित गव्हाणेंच्या प्रचारासाठी त्यांचा दौरा असेल. त्यानंतर पिंपरीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत, चिंचवडचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारानिमित्त नागरिकांशी संवाद साधतील. त्यानंतर संध्याकाळी कात्रजमध्ये बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय.

  • आज राज्यात दिग्गजांच्या सभांचा धडाका 

    राज्यातील प्रचार शिगेला पोहोचलाय. सर्व दिग्गज राजकीय नेते आज प्रचाराचा धाडका लावणारेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आज राज्यात 7 सभा होणार आहेत. मुख्यमंत्री मुंबईसह अहिल्यानगर, जालन्यात सभा घेणार आहेत. तर उद्धव ठाकरे यवतमाळ, वाशिम, जळगाव जिल्ह्यात प्रचाराचा धडाका लावणारेत. देवेंद्र फडणवीस नागपूर, गोंदियासह मुंबईत प्रचार सभा घेणारेत. शरद पवार आज धुळे, जळगाव जिल्ह्यात 5 सभा घेणार आहेत. दोंडाईचा, पारोळा, मुक्ताईनगर, जामनेर आणि शेवटची सभा धरणगावमध्ये होणारेय.

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link