Maharashtra Breaking News LIVE Updates: नंदिग्राम एक्सप्रेसच्या डब्याला लागली आग, प्रवाशांनी ट्रॅकवर मारल्या उड्या

Swapnil Ghangale Sat, 09 Nov 2024-7:57 pm,

Maharashtra Breaking News LIVE Updates: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा उडालेल्या राजकीय धुरळ्याबरोबरच दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा घेण्यासाठी, ताज्या घडामोडींचे संक्षिप्त अपडेट्स...

Latest Updates

  • नंदिग्राम एक्सप्रेसच्या डब्याला लागली आग, प्रवाशांनी ट्रॅकवर मारल्या उड्या

    कसारा येथे रेल्वे रुळाच्या बाजूला असलेल्या गवताला आग लागली. गवताला लागलेली ही आग पसरून रेल्वे रुळावर आल्यामुळे याच रुळावरून धावणाऱ्या नंदिग्राम एक्सप्रेसच्या डब्यालाही आग लागली. यावेळी एक्सप्रेस मधील प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन ट्रॅकवर उड्या मारल्या. रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून कॉम्प्रेसरमध्ये आग लागल्याची  माहिती मिळत आहे. 

  • लोणावळयात आमदार सुनील शेळके आणि बंडखोर उमेदवार बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

    लोणावळयात आमदार सुनील शेळके आणि बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. आमदार सुनील शेळके लोणावळयात प्रचार करत असताना लोणावळयातील राम मंदिरात दर्शनासाठी आले होते. मात्र त्यावेळी अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांच्या कार्यकर्त्यांनी सुनील शेळके यांना दहशत निर्माण केल्याने वातावरण चांगलेच तापले. 

  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी राजू शेट्टींना दिली सोडचिट्टी

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा तिसऱ्या आघाडी सोबत जाण्याचा निर्णय त्यांच्याच अंगलट आलेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी राजू शेट्टींना सोडचिट्टी दिली असून त्यांनी आता महायुती सोबत जाण्याचा घेतला निर्णय घेतलाय. विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता तिसऱ्या आघाडीचे संधान बांधल्याने कार्यकर्त्यांनी त्यांना सोडचिट्टी दिली आहे. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालिंदर पाटील, सावकार मादनाईक, जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, वैभव कांबळे यांच्यासह पदाधिकारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कारभारावर नाराज आहेत.  

  • 'एक है तो सेफ है' च्या घोषणेवर शरद पवारांची टीका

    'एक है तो सेफ है' च्या घोषणेवर शरद पवारांनी टीका केलीय. 'भाजप विधानसभा निवडणूक जातीयवादाकडे नेत आहे. जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणत शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. 

  • निवडणूक लढायची असेल तर मर्दा सारखे लढा .. - उद्धव ठाकरे 

    विधानसभा निवडणुकांच्या पाश्वभूमीवर प्रचार सभा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शनिवारी नांदेडमध्ये सभा घेतली. या सभेत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणजे मेंदी आणि गद्दार  माझ्यावरती आरोप करतात कि मी विचार सोडले, मी विचार सोडलेले नाहीत. केंद्रीय यंत्रणांना बरोबर घेऊन तुम्ही निवडणुका लढता. त्यांच्या युतीत ईडी, सिबिआय आहेत. माझ्याकरता कार्यकर्त्यांना तडीपारीकरता आता जनता 23 तारखेला तुम्हालाही तडीपार करणार. तसेच निवडणूक लढायची असेल तर मर्दा सारखे लढा असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. 

  • काँग्रेस एका जातीला दुसऱ्या जातीशी लढवत आहे; पंतप्रधान मोदींचा घणाघात

    "महाराष्ट्रात पुन्हा महायुतीच सरकार पाहिजे. महायुती आहे तर गती आहे , तरच महाराष्ट्राची प्रगती आहे. महाआघाडी म्हणजे टोकण मनी, घोटाळे. या दिवसात तेलंगणा, कर्नाटक आता एटीएम बनले आहे. आम्ही महाराष्ट्राला आघाडीचा एटीएम बनू देणार नाही. काँग्रेस एका जातीला दुसऱ्या जातीशी लढवत आहे. एक है तो सेफ है हे लक्षात ठेवा. काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना वारंवार अपमानित केलं आहे. माझ्यासाठी बाबासाहेब आंबेडकर पूजनीय आहेत," असं मोदी म्हणाले. 

  • कोणी झोपडीत राहत असेल तर मला कळवा; पंतप्रधान मोदींचं अकोल्यात आवाहन

    "आम्ही 4 करोड घर बांधून दिली. आता आम्ही 3 कोटी नवीन घर बांधायला सुरुवात केली आहे. जर एखादं कुटुंब झोपडीत राहत असेल तर मला कळवा. आघाडीने ज्या मागण्या पूर्ण करू दिल्या नाही ते आम्ही केल्या," असा दावा पंतप्रधान मोदींनी अकोल्यातील भाषणात केला. अकोला जिल्ह्याला कापसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कापसाचे उद्योग आणि यंत्रणेला पुढे नेण्यात येत आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

  • महाराष्ट्राच्या लोकांनी भाजपावर खूप प्रेम केलं; महाराष्ट्राची सेवा करण्यात मला वेगळा आनंद मिळतो : मोदी

    पंतप्रधान मोदींनी अकोल्यातील भाषणाची मराठीत सुरुवात केली. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी गजानन महाराजांना नमन केलं. "9 नोव्हेंबर हा महत्वाचं दिवस आहे. आजच्या दिवशी राम मंदिराचा निर्णय सर्वोच न्यायलाने दिला होता," असं मोदी भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले. तसेच पुढे बोलताना, "महाराष्ट्राच्या लोकांनी भाजपवर खूप प्रेम केलं. महाराष्ट्राची सेवा करण्यातून मला एक वेगळा आनंद मिळतो," असं पंतप्रधान म्हणाले.

  • कुऱ्हाडीने वार करुन मसनेच्या जिल्हाध्यक्षाची निर्घृण हत्या

    सांगलीमधील मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर खाडे यांचा निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मिरज-पंढरपूर रोडवरील राममंदिर परिसरात अज्ञातांकडून मनसेच्या पदाधिकाऱ्याची हत्या  करण्यात आली. कुऱ्हाडीने वार करत खाडे यांचा खून करण्यात आला. उपचार सुरू असताना खाडे यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. शेतजामीनीच्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुधाकर खाडे हे मनसेच्या स्थापनेपासून गेल्या काही वर्षांपर्यंत मनसेमध्ये सक्रिय होते. मात्र गेल्या 2-3 वर्षांपासून राजकारणापासून खाडे अलिप्त होते. काही दिवसांपूर्वी सुधाकर खाडे यांनी भाजपात प्रवेश केला होता.

  • ठाकरेंना शिंदेंचा मोठा धक्का! महत्त्वाचा शिलेदार आपल्या पक्षात घेण्यात मुख्यमंत्र्यांना यश

    उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षातील भिवंडीचे संपर्कप्रमुख आणि माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवारी नाकारल्याने रुपेश म्हात्रे नाराज झाले होते. याबाबतची त्यांची नाराजी त्यांनी जाहिरपणे बोलून दाखवली होती. अखेर त्यांनी काल ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र करत हाती भगवा झेंडा घेऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

  • भाजपाला भान नाही; शरद पवारांचा टोला

    धर्मा-धर्मात जाती-जातीमध्ये कुणी तेढ निर्माण करू नये पण भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना याचे भान नाही - शरद पवार 

  • मुंबई जिंकण्यासाठी भाजपचा विजयी शंखनाद; मोदी-शाहांनी कंबर कसली

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपची मुंबईत मोठी सभा होणार आहे. 12 नोव्हेंबर रोजी शाहांच्या मुंबईत 2 जाहीर सभा होणार आहे. बोरिवलीच्या सप्ताह मैदान आणि घाटकोपरच्या जनरल अरुणकुमार वैद्य उद्यानात भाजपकडून विजयी शंखनाद सभांचे आयोजन केलं जाणार आहे. घाटकोपरला सायंकाळी पाच वाजता तर बोरिवलीत संध्याकाळी साडेसहा वाजता सभेचे आयोजन केलं जाणार आहे. मुंबईतील सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी भाजपकडून तयारी सुरु आहे. अमित शाहांच्या पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदीही 14 तारखेला मुंबईत सभा घेणार आहेत.

  • मोदी आल्यावरच महाराष्ट्रातील लोकांना 'अनसेफ' वाटतं; राऊतांचा टोला

    'एक है तो सेफ है' म्हणणारे मोदी महाराष्ट्रात आल्यानेच लोकांना अनसेफ वाटू लागतं. महाराष्ट्रातील लोकांनी बटेंगे तो कटेंगे फेकून दिल्याने पंतप्रधानांना ही भाषा वापरावी लागत आहे. तुम्ही महाराष्ट्रात आला तर लोकांना भडकवणार. दंगलींसाठी प्रोत्साहन देणार. जोपर्यंत तुम्ही इथे येणार तोपर्यंत इथे अनसेफ आहे. म्हणून तुम्हाला आम्ही बाहेर फेकणार आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

     

  • उद्या अमित शाह मुंबईमध्ये; भाजपासंदर्भात मोठ्या घोषणेची शक्यता

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत भाजपचा विधानसभेचा जाहीरनामा शहांच्या हस्ते प्रकाशित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

     

  • ठाकरेंच्या शिवसेनेतून आणखी एका नेत्याची हकालपट्टी; माजी खासदाराला पक्षामधून काढलं

    शिवसेनेचे हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली जात आहे, असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं जाहीर केली आहे.

  • पालघर: कारमधून 3 कोटी 70 लाखांची कॅश जप्त

    पालघरच्या वाडा येथे 3 कोटी 70 लाखांची कॅश जप्त केली आहे. वाडा येथून विक्रमगडकडे जाणारे संशयित वाहन ताब्यात घेऊन चौकशी केली असता या वाहनात कोट्यावधींची कॅश असल्याची उघड झालं. नवी मुंबईतील ऐरोली येथून कॅश घेऊन जाणारं वाहन वाडा, जव्हार, मोखाडा येथे जात असल्याची पोलिसांची माहिती आहे.

  • राज ठाकरेंच्या आज 2 सभा

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उमरखेड विधानसभा चे उमेदवार राजेंद्र नजरधने यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा. वेळ सकाळी 11 वाजता होणार आहे. त्यानंतर कसबा पेठ विधानसभेतील उमेदवार गणेश भोकरे आणि कोथरूड विधानसभेचे उमेदवार किशोर शिंदे यांच्यासाठी सभा होतील. 

  • वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा सायंकाळी 4.00 वाजता जाहीर होणार आहे.

  • थंडीविना केवळ 19 टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या

    रब्बीतील पेरण्यांसाठी एक महिना उलटून गेला तरी राज्यात आतापर्यंत केवळ 19 टक्के क्षेत्रावर म्हणजे 11 लाख 34 हजार हेक्टरवरच पेरण्या झाल्या. सर्वाधिक सुमारे 4 लाख 91 हजार हेक्टरवर पेरण्या पुणे विभागात झाल्या आहेत. एकूण पेरण्यांत 34 टक्के क्षेत्रावर रब्बी ज्वारी, 17 टक्के हरभरा व केवळ 4 टक्के सरासरी क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे.

  • मोदींच्या आज महाराष्ट्रात दोन सभा

    देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकोल्यात सभा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 10.30 ते 12 वाजताच्या दरम्यान ही सभा होणार आहे. त्यानंतर मोदींची नांदेडमध्ये जाहीर सभा होणार असून येथील लोकसभेच्या पोटनिवडणुकीचे उमेदवार संतुक हंबर्डे आणि नांदेड जिल्ह्यातील महायुतीच्या 9 उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा होत आहे.

  • मुख्यमंत्र्यांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यातील शिवाजी नगर येथे प्रचाराला आले असता त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची त्यांनी भेट घेतली व प्रकृतीची विचारपूस केली. आंबेडकर यांच्यावर काही दिवसांपूर्वी एन्जोप्लास्टी झाली होती. त्या पार्श्वभूमीवर अनेक नेते त्यांची भेट घेत आहेत. 

  • उत्तर महाराष्ट्रात पुढील पाच दिवस थंडीचे

    उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान 15 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. शुक्रवारी (8 नोव्हेंबर) नाशिकमध्ये राज्यात सर्वांत कमी १४.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात पुढील पाच दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे.

  • पेणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; अनंत गितेंचं नाव घेत 'या' नेत्याने सोडला पक्ष

    ठाकरेंच्या शिवसेने पेण विधानसभेचे समन्वयक शिशिर धारकर यांनी राजीनामा दिला आहे. शिशिर धारकर पेण विधानसभेसाठी इच्छुक होते. राजीनामा देण्यासाठी अनंत गिते कारणीभूत असल्याच शिशिर धारकर यांचं म्हणणं आहे. जानेवारी 2024 पासून ठाकरे गटाचे नेते अंनत गिते यांच्या सांगण्यावरून मला स्थानिक पदाधिकारी बाजूला करत असल्याचा शिशिर धारकर यांचा आरोप आहे.  शिशिर धारकर यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात ऑगस्ट 2023 मध्ये प्रवेश झाला होता. शिशिर धारकर हे पेण अर्बन बँकेच्या घोटाळ्याचे मुख्य आरोपी आहेत. 23 सप्टेंबर 2010 ला पेण अर्बन बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले, सातत्याने ऑडीट रिपोर्टमध्ये अ वर्ग मिळवणारी ही बँक एकाएकी अडचणीत आली होती. बँकेच्या प्रकरणात शिशिर धारकर यांच्या समवेत बँकेच्या संचालक, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी सध्या सुरु असून शिशिर धारकर हे मुख्य आरोपी आहेत.

  • मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात! बस ट्रकवर आदळली; 15 जखमी, 8 गंभीर

    मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. खोपोलीजवळ पहाटे 4 वाजता ही दुर्घटना घडली. अपघातात 15 जखमी प्रवासी  पैकी 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. कोल्हापूरकडून मुंबईकडे जाताना या बसचा अपघात झाला. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर उभ्या असणाऱ्या ट्रकवर बस आदळून अपघात झाला. बोरघाट पोलीस, खोपोली पोलीस, आय आर बी यंत्रणा, देवदूत यंत्रणा, वाहतूक पोलीस अपघात ठिकाणी दाखल झाले आहेत. गंभीर जखमींना मुंबई येथील रूग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आलं आहे. या अपघातामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्याच्या काम सुरु आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link