मुंबई / सांगली : जिल्ह्यात सद्यस्थितीत ६४१ कोरोना बाधित असून ही स्थिती गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळावेत. मास्कचा वापर अनिवार्यपणे करावा. अनावश्यक गर्दी टाळावी. अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, अशी स्पष्टता जलसंपदामंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोविडच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार व कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी आदी अधिकारी उपस्थित होते.


सांगली जिल्ह्यात आजतागायत ६४१ कोरोना बाधित झाले असून यापैकी उपचाराखाली सद्यस्थितीत ३०४ रूग्ण आहेत तर ११ रूग्णांची स्थिती चिंताजनक आहे. तर आत्तापर्यंत १९  जणांचा मृत्यू झाला आहे. आजतागायत आढळून आलेल्या रुग्णांपैकी ग्रामीण भागातील ४७४, शहरी भागातील ६७ तर महानगरपालिका क्षेत्रातील १०० रूग्ण आहेत. रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून ही स्थिती गंभीर आहे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील यांनी तालुकानिहाय कोरोना बाधित रूग्णांचा सविस्तर आढावा घेतला. 



 जवळपास २०० कंटेनमेंट झोन असून ज्या ठिकाणी कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन आराखड्याची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना दिल्या. जिल्ह्यात झपाट्याने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये. सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळावेत. मास्क, वैयक्तिक स्वच्छता नियम पाळून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात सर्वोतोपरी सहभाग द्यावा. सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळल्यास व आवश्यक खबरदारी न घेतल्यास जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, असे स्पष्ट केले.


ज्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नाहीत त्या ठिकाणी पोलिसांनी कठोर कारवाई करावी. ५० वर्षावरील आणि कोमॉर्बिडीटी असणाऱ्या लोकांच्या सर्व्हेसाठी महानगरपालिका क्षेत्रात २० प्रभागांमध्ये २० पथके कार्यरत करण्यात आली असून लवकरच हा सर्व्हे पूर्ण करण्यात येईल याचाही आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतला.