जावेद मुलानी, बारामती : कोरोनामुळे लॉकडाऊन असलेल्या बारामतीत लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहेत. उद्यापासून सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत व्यवहार सुरु राहणार आहेत. बारामती शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येला आळा बसावा यासाठी सात दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. आज लॉकडाऊनची मुदत संपली असून उद्या शुक्रवार पासून सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत राज्य आणि केंद्र शासनाने परवानगी दिलेल्या आस्थापना सुरू होणार असल्याची माहिती बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारामती शहरात १६ जुलैपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. आज या लॉकडाऊनची मुदत संपल्यामुळे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी लॉकडाऊन शिथिल करत असल्याचा आदेश पारित केला आहे. 


दरम्यान शहरातील ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत तो भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या ठिकाणी कोणतेही व्यवहार सुरू राहणार नाहीत. तसेच सद्यस्थितीत कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने असल्यामुळे नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करू नये. त्याचबरोबर शहरात वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन देखील प्रांताधिकारी कांबळे यांनी केले आहे.