Lockdown : नाशिक शहरात पुन्हा कडक लॉकडाऊनची घोषणा
नाशिकमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन
योगेश खरे, नाशिक : नाशिक शहरात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. 12 मे ते 22 मे दरम्यान हा कडक लॉकडाऊन लागू असणार आहे. यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवा, मेडिकल आणि हॉस्पिटल सुरू राहणार आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नाशिक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी शहरात लॉकडाऊनची माहिती दिली. आयुक्त कैलास जाधव यांनी म्हटलं की, वाढत्या रुग्णसंख्येमुळे नाशिक शहराची चिंता वाढली आहे. त्यामुळे पुढील १० दिवस कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वैद्यकीय, अस्थापना वगळता सर्व अस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.'
'या काळात संपूर्ण औद्योगिक वसाहती देखील बंद असतील. इन हाउस वसाहतींना परवानगी असेल. पेट्रोल पंपावर फक्त अत्यावश्यक वाहनांना परवानगी देण्यात येईल.'
राज्यात कोरोना रुग्णांमध्ये घट होत असली तरी संकट अजूनही कायम आहे. कोरोनाची तिसरी लाट आणखी किती घातक असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आतापासून त्यावर उपाययोजना करण्याची तयारी सुरु झाली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन हाच एक पर्याय आहे. त्यामुळे संसर्ग वाढल्यानंतर शहरात लॉकडाऊन करण्याची वेळ येते. लोकांमध्ये अजूनही गांभीर्य दिसत नसल्याने कोरोना रुग्णांमध्ये वाढ पाहायला मिळत आहे.