नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पात टोळधाडीनं आक्रमण केलंय. विदर्भात सध्या टोळधाड पसरली आहे. सोमवारी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पश्चिमेकडच्या कोलीतामारा भागातून टोळधाडीनं प्रवेश करुन दुपार नंतर पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पूर्वेकडील भागात बोरबन, चोर बाहुली, सिलारी, पिपरिया भागात धडक दिली. कृषी विभाग व वन विभाग यांच्या समन्वयातून त्यांचे निरीक्षण करण्यात आले. पेंच संरक्षित क्षेत्र असल्याने कीटनाशकांचा वापर केला गेला नाही तसेच त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्नही केला नाही.


मंगळवारी दुपारी पाऊस झाल्याने त्यांनी आपला मोर्चा मनसर भागाकडे वळवला. सदर टोळ धाडीचे योग्य पद्धतीने निरीक्षण करण्यासाठी क्षेत्रीय कर्मच्या-यांना सूचना देण्यात आल्या आहेत. या टोळधाडीनं शेतक-यांचेही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान मुख्य वन सरंक्षक तथा क्षेत्र संचालकांनी मंगळारी पेंच मधील प्रभावित भागाची पाहणी केली. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना याबाबत दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.