लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून शाहू महाराजांना उमेदवारी? एका तासाच्या चर्चेत काय घडलं? जाणून घ्या
Lok Sabha Election 2024: कोल्हापूरच्या जागेसाठी छत्रपती शाहू महाराजांना संधी मिळणार का? असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला.
Lok Sabha Election 2024: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी छत्रपती शाहू महाराज यांची न्यू पॅलेस येथे भेट घेतली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती संभाजी राजे आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाची चर्चा होत असताना आजच्या भेटीकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात होती. न्यू पॅलेसमध्ये शरद पवारांसोबत झालेल्या भेटीमध्ये शाहू महाराज छत्रपती आणि मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते. एक तासाहून अधिक काळ शरद पवार आणि शाहू महाराज छत्रपती यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी काय झाले याची माहिती शरद पवारांनी दिली.
कोल्हापुरच्या जागेसाठी छत्रपती शाहू महाराजांना संधी मिळणार का? असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही, असे ते म्हणाले. उमेदवारीबाबत मविआसोबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मविआमध्ये 39 जागांवर एकमत झाले आहे.
मराठा आरक्षणाचं कोर्टात काय होईल सांगता येत नाही. आमच्या सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टानं आरक्षण नाकारल्याचे त्यांनी सांगितले.
तर मला आनंद
लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज उमेदवार असतील तर मला आनंद होईल असे शरद पवार यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी पहिल्यांदाच शाहू महाराजांच्या बद्दल स्पष्ट भूमिका मांडली. शाहू महाराजांच्या उमेदवारी बाबत तिन्ही पक्षांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल, असे ते म्हणाले.
कोल्हापूरकरांचा आग्रह असेल तर
शाहू महाराज यांना राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त रस आहे. कोल्हापूरकरांचा आग्रह असेल तर शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत मला आनंदच होईल, असे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडी कडून लोकसभेच्या 39 जागांवर एकमत झालं आहे. दोन ते तीन जागांबद्दल खलबत्त सुरू आहेत. मी, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे एकत्र बसून या जागांबद्दल निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजप खूप कमी आकडे सांगतेय
भाजप देशात 400 पेक्षा जास्त आणि राज्यात 40 पेक्षा जास्त जागा सांगत आहे मला वाटतं हे खूप कमी आकडे सांगत आहेत, असा खोचक टोला त्यांनी लगावला.