योगेश खरे, झी २४ तास, नाशिक : लोकसभा निवडणूक २०१९ च्या निकालाचे अचूक भाकीत वर्तविणाऱ्यास एकवीस लाख रूपये जिंकण्याचे महाराष्ट्र 'अंधश्रध्दा निर्मूलन समिती'ने ज्योतिषांसाठी केलेल्या जाहीर आव्हानाला राज्यातून एकाही ज्योतिष्याने प्रतिसाद दिलेला नाही. यासाठी २० मे ही अखेरची तारीख होती. नाशिकच्या 'ज्योतिष संमलेनात' हे आव्हान करून अंनिसनं केलं होतं. परंतु, ज्योतिष-विद्वानांनी मात्र हे आव्हान स्वीकारलंच नाही, त्यामुळे हे कुठलंही शास्त्र नसून थोतांड असल्याचे सिद्ध झाल्याचं' अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी कृष्णा चांदगुडे यांनी म्हटलं आहे. 


कृष्णा चांदगुडे

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात आणि देशात होणाच्या विविध स्तरांवरील निवडणूक निकालाचे भाकीत भविष्यवक्ते प्रत्येक निवडणुकीवेळी वर्तवत असतात. त्यांचे हे भविष्य प्रसार माध्यमांद्वारे लोकांच्यासमोरही येते. त्यामुळे अज्ञानी आणि भाबड्या लोकांमध्ये अंधश्रध्दा निर्माण होतात. यालाच विरोध म्हणून फसवणूक करणाऱ्यांविरोधात ठाम भूमिका घेत महाराष्ट्र अंनिसने देशातील सर्वच ज्येतिषांना हे आव्हान दिलं होतं. लोकसभा २०१९ च्या निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवून एकवीस लाख रूपयांचे बक्षीस जिंकण्याचे जाहीर आव्हान अंनिसनं केलं होतं. 


यासाठी अंनिसने प्रश्नावलीही प्रसिद्ध करून ती आणि पंचवीस नामांकित विद्वानांकडे पोहोचती केली होती. परंतु, प्रसार माध्यमांद्वारे ज्योतिषी भाकीत वर्तविणारे स्वयंघोषित विद्वान अंनिसच्या या खुल्या स्पर्धेत मात्र सहभागी झाले नाहीत. सर्व प्रक्रिया पारदर्शक असताना ज्योतिषांनी एकवीस लाखाचे आव्हान का स्विकारले नाही? असा सवाल अंनिसने उपस्थित केला आहे. 



ज्योतिषी हा धंदा केवळ पैसा कमावण्याचा असून स्वप्न विकण्याची कला आहे. त्यामुळे या फसवणुकीबाबत समाजाने जागृत राहावे आणि अशा तथाकथित विद्वानांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही कृष्णा चांदगुडे यांनी केलंय.