नांदेड : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासाठी लोकसभा २०१९ची निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई झाली आहे. वंचीत बहुजन आघाडीमुळे चव्हाणांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. वंचित बहुजन आघाडीने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रसेच्या बालेकिल्ल्यात चमत्कार होणार का, याची उत्सुकता आहे. दरम्यान, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असताना चव्हाण यांनी बाजी मारली होती. मात्र, आता तसे चित्र दिसत नाही. काँग्रेसचा सामना भाजपशी असला तरी वंचित बहुजन आघाडी यावेळी काँग्रेसची मते खाण्याची शक्यता आहे. त्यामुळे चव्हाणांसाठी मोठी धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशोक चव्हाण मोदी लाटेतही नांदेडमधून ८० हजारांच्या मताधिक्याने निवडून आले होते.  यावेळी निवडणूक चव्हाणांसाठी बिकट असल्याचे दिसत आहे. कारण वंचित बहुजन आघाडीमुळे निवडणूक तिरंगी झाली आहे. प्रकाश आंबेडकरांमुळे वंचित बहुजन आघाडीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे काँग्रेस हक्काच्या समजत असलेली दलित मते मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीकडे वळल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे नांदेडमध्ये समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीच्या आघाडीने चांगला उमेदवार दिल्याने मुस्लीम मते फुटण्याची शक्यता आहे. नांदेडच्या राजकारणात अशोक चव्हाणांना नेहमीच मुस्लीम आणि दलित मतांचा आधार मिळाला आहे. मात्र, हा आधार या निवडणुकीत मिळणार का? याचीच चिंता आहे. 


दलित आणि मुस्लिम मते एकत्र मिळाल्यामुळे काँग्रेसला यश मिळत गेले. पण २००४ च्या निवडणुकीत दोन उमेदवारांनी या मतांचे विभाजन केले आणि आणि भाजपला संधी मिळाली होती. यावेळी वंचित बहुजन आघाडीने मोठे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांसाठी ही धोक्याची घंटा आल्याचे राजकीय जाणकार सांगतात.


आदर्श प्रकरणानंतर बाजुला सारले गेलेल्या अशोक चव्हाण यांना २०१४ च्या लोकसभेची उमेदवारी देऊन काँग्रेसने पुनर्वसन केले. चव्हाणांना नांदेडकरांनी साथ दिली. पुढे चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाले. पण आता राजकीय समीकरणे बदलल्यामुळे अशोक चव्हाणांचा हा बालेकिल्ला कायम राहणार की हातचा जाणार याचीच उत्सुकता आहे.