नांदेड : लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी राज्यभरात पाहायला मिळत आहे. मतदानाची तारीख जसंजशी जवळ येत आहे तसा राजकीय ज्वर अधिकच पाहायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावरही भाजपा नेत्यांनी अनेक आरोप केले आहेत. पण या सर्व आरोपांना तोंड देताना चव्हाणांनी नांदेडवासियांना भावनिक साद दिली आहे. मला चक्रव्युव्हात अडकवण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नांदेडच्या सभेत अशोक चव्हाणांनी आपली खंत व्यक्त केली आहे. मी तुमच्यासोबतच जगणार तुमच्या सोबतच मरणार असे भावनिक आवाहनही अशोक चव्हाण यांनी केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दरम्यान रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. अशोक चव्हाण हे घोटाळे करुण हायकमांडला पैसे देण्यात व्यस्त होते असा गंभीर आरोप रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केला. ते आज नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद इथे प्रचारसभेत बोलत होते.



नांदेड लोकसभेचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण हे मागील ५ वर्षात कधीही आपल्याला भेटायला आले नाहीत. मला संसदेतही त्यांचे कधी दर्शन झाले नाही. यावरून त्यांना या भागाच्या विकासाची चिंता नसल्याचे स्पष्ट होते असा आरोप रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केला आहे.  आदर्श खासदार हे घोटाळे करून हायकमांडला पैसे देण्यातच सगळा विकास विसरून गेले असा गंभीर आरोपही गोयल यांनी केला.