मुंबई : लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सर्व पक्ष करत आहेत. या निवडणुकीतही उमेदवारांचा सोशल मीडिया कॅम्पेनिंगकडे जास्त कल पाहायला मिळत आहे. प्रचार सभांसोबतच फेसबुक, ट्वीटर सारख्या सोशल मीडियातही राजकीय पक्ष पुढे दिसत आहेत. चर्चेत राहण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवण्यात येत आहेत. दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा हे देखील विविध प्रमोशन व्हिडीओच्या माध्यमांतून जनतेपर्यंत पोहोचत आहेत.  उद्योगपती मुकेश अंबानी हे मिलिंद देवरा यांचे तोंडभरून कौतुक करतानाचा एक व्हिडीओत सोशल मीडियात सध्या चर्चेत आहे.  आमच्यासाठी मिलिंद देवरा यांनी चांगले काम केल्याचे या व्हिडीओत उद्योगपती आणि दुकानदार सांगताना दिसत आहेत. पण खुद्द मुकेश अंबानी देखील या व्हिडीओत असल्याने चर्चा तर होणारच....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


उद्योगपती मुकेश अंबानी राहत असलेला अॅंटीलीया महल हा दक्षिण मुंबईत येतो. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत सध्या दक्षिण मुंबईचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्या विरोधात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांचे आव्हान आहे. दोघेही सुशिक्षित, प्रभावी, दांडगा जनसंपर्क असलेले नेते आहेत. संपूर्ण मतदार संघात दोघांसाठीही संमिश्र प्रतिसाद आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईची लढत रंगतदार ठरणार आहे. दोघांच्या मतदार संघातील प्रचाराचा धडाका सुरू असताना त्यात सोशल मीडियातील कॅम्पेनिंगची भर आहे.