रायगड : हिंदुत्व या राष्ट्रीय मुद्द्यावर शिवसेना आणि भाजपा राज्यात पुन्हा एकत्र आले आहेत. भगवे वादळ आणण्याच्या मुद्द्यावर शिवसेना मतदारांना साथ देत आहे. दुसरीकडे मुस्लिम मतदारांना एकत्र घेऊन जाण्याकडे शिवसेना यशस्वी होताना दिसत आहे. माजी मुख्‍यमंत्री बॅरिस्‍टर ए. आर. अंतुले यांचे चिरंजीव नवीद अंतुले यांनी शिवसेनेत प्रवेश केल्‍यानंतर शिवसेनेने रायगड जिल्‍हयात सोशल इंजिनीअरिंग सुरू केले आहे. आणि ते यशस्‍वी होताना दिसत आहे. रायगडमधील शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांच्‍या ठिकठिकाणी होणाऱ्या प्रचार सभांमध्‍ये मुस्‍लिम तरूण मोठया संख्‍येने शिवसेनेत प्रवेश करू लागले आहेत. यामुळे राष्‍ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांची डोकेदुखी वाढली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आंबेत या बॅरिस्‍टर अंतुले यांच्‍या जन्‍मगावी झालेल्‍या शिवसेनेच्‍या मुस्‍लिम समाज मेळाव्‍याला जवळपास 2 हजार मुस्‍लिमांनी हजेरी लावली. विशेष म्‍हणजे मुस्‍लिम समाजातील महिलाही मोठया संख्‍येने उपस्थित होत्‍या. मुस्‍लिम समाजाकडे व्‍होट बँक म्‍हणून काही लोक पहात होते. परंतु त्‍यांची जहागिरी संपली असल्‍याचा टोला अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांना यावेळी लगावला.



तर आतापर्यंत मुस्‍लिम समाजाला शिवसेनेची भीती दाखवून मुख्‍य प्रवाहापासून दूर ठेवले जात होते. परंतु या समाजाने आता या विकासाच्‍या मुख्‍य प्रवाहात सहभागी व्‍हावे, असे आवाहन नवीद अंतुले यांनी यावेळी केले. त्यामुळे येणाऱ्या काळात रायगड सोबतच राज्यातील राजकारणाची गणितं बदलतात का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.