कृष्णात पाटील, झी मिडिया मुंबई  : मुंबईच्या उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये शिवसेनेचे गजानन किर्तीकर आणि काँग्रेसचे संजय निरूपम यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. २०१४ नंतर या मतदारसंघात शिवसेना आणि भाजपची संघटनात्मक ताकद वाढली आहे. त्यामुळे काँग्रेससाठी ही लढत काहीशी अवघड जात असली तरी ती संजय निरूपम यांनी इथं चांगली हवा केली आहे. उत्तर मुंबईमधून लढलेल्या संजय निरूपम यांना खरं तर उत्तर मध्यमधून लढायचं होतं. परंतु पदरी पडला उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ. तरीही ते शिवसेनेचे उमेदवार गजानन किर्तीकर यांच्याविरोधात काटाजोड लढत देण्याचा प्रयत्न करत आहेत. जातधर्मिय आणि भाषिक समीकरणं इथं प्रभावी ठरणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ६ लाख ६ हजार मतदार हे मराठी भाषिक आहेत. यानंतर ३ लाख ६२ हजार उत्तर भारतीय मतदार आहेत. मुस्लिम मतदारांची संख्या ३ लाख ३४ हजार आहे. गुजराती आणि राजस्थानी मतदार आहेत सुमारे २ लाख. दक्षिण भारतीय १ लाख २० हजार आणि ख्रिश्चनांची संख्या ४५ हजार आहे. 


उत्तर भारतीय आणि मुस्लिम व्होट बँकेवर काँग्रेसच्या संजय निरूपम यांची नजर आहे. विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपच्या पाठिशी राहिलेला उत्तर भारतीय समाज आता तेवढ्याच ताकदीनं शिवसेना उमेदवाराच्या पाठिशी राहणार नाही. ज्याचा फायदा काँग्रेसला होणार आहे. परंतु इथं सपाचे उमेदवार सुभाष पासींकडं काही उत्तर भारतीय मतदार वळू शकतो. ज्याचा फटका संजय निरूपम यांना काही प्रमाणात बसू शकतो.



शिवसेनेच्या गजानन किर्तीकरांची सारी भिस्त मराठी मतदारांवर तर आहेच शिवाय भाजपमुळं गुजराती-मारवाडी आणि काही प्रमाणात उत्तर भारतीय मतदारही त्यांच्या पाठिशी उभे राहतील अशी अपेक्षा आहे. इथं सेना भाजपची संघटनात्मक ताकद चांगली असून सहाही विधानसभा मतदारसंघात शिवसेना भाजप महायुतीचे आमदार आहेत. तसंच एक राज्य मंत्रिमंडळात एक कॅबिनेट मंत्री आणि दोन राज्यमंत्रीही इथले आहेत. मुंबई महापालिकेच्या इथल्या ४५ नगरसेवकांपैकी भाजपचे २२ आणि शिवसेनेचे १७ असे एकूण ३९ नगरसेवक महायुतीचे आहेत. तर काँग्रेसचे ४ आणि राष्ट्रवादीचे २ असे ६ नगरसेवक आघाडीचे आहेत. 


या मतदारसंघातील सर्वाधिक सत्तास्थाने महायुतीकडं आहेत. विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत मिळालेल्या मतांचा सांख्यिकीय आधार घेतला तरी तो महायुतीच्या बाजूने झुकणारा आहे. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत संजय निरुपमने उत्तर पश्चिम मतदार संघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळेस त्यांच्यासमोर काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते सुनील दत्त यांचे आव्हान होते. या निवडणुकीत सुनील दत्त यांनी संजय निरुपमचा 47358 मताधिक्याने  पराभव केला होता.