पालघर : लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराला सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावलेला दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून रस्सीखेच सुरू आहे. कुठे उमेदवार पळवापळवी तर कुठे जागेवरून मित्र पक्षांमध्येच कलह देखील पाहायला मिळत आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी सत्ताधारी पक्षाला विविध मुद्दयांवरून घेरत आहे. तर भाजप-शिवसेनाही एकत्रित सर्वाला प्रत्युत्तर देत आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वसईतील नायगाव भागातून प्रचाराला सुरवात केली. प्रचारात त्यांनी ठाकुर कुटुंबियांना लक्ष्य केल्याचे पाहायला मिळाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाकूर परिवार गुंडगिरी करतो असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. ठाकूर परिवारावर टीका करत उद्धव ठाकरेंनी अनेक सामाजिक व धार्मिक स्थळांना भेटी देऊन युतीच्या उमेदवाराला मतदान करा असं आवाहन ठाकरेंनी केलं वसईतल्या शिवसेना भाजप वाद संपलेला आहे. युतीचा धर्म पाळा असं  आवाहन त्यांनी केलं. तसेच उद्धव ठाकरे यांनी  यावेळी चिमाजी आप्पा स्मारकाला पुष्पहार अर्पण करत पुढे पत्रकार परिषदेला सुरूवात केली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आज प्रसारित केलेल्या कॉग्रेसच्या जाहीरनाम्यावर सडकून टीका केली आहे.  


राजेंद्र गावित यांना हितेंद्र ठाकूर हे टक्कर देतांना दिसणार आहेत. बहुजन विकास आघाडीला काँग्रेस आणि सीपीआयने पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत युती विरुद्ध ही महाआघाडी असा सामना रंगणार आहे.


29 एप्रिलला मतदान  


पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यामुळे येथे कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत अनेक दिवस चर्चा रंगली होती. पण शिवसेनेने भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना शिवसेनेत घेऊन त्यांना उमेदवारी दिली. तर श्रीनिवास वनगा यांना विधीमंडळात पाठवणार असल्य़ाचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं. पालघर पोटनिवडणुकीत शिवसेनेतर्फे श्रीनिवास वनगा आणि राजेंद्र गावित यांच्यातील निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. पण आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र गावित यांचा शिवसेना प्रवेश झाला आणि त्यांची उमेदवारीही जाहीर झाली. २९ एप्रिलला येथे मतदान होणार आहे


२०१८ च्या पोटनिवडणुकीचा निकाल


२०१८ च्या पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित यांना २ लाख ७२ हजार ७८२ मते मिळाली. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांचा २९ हजार ५७२ मतांनी पराभव केला. यामध्ये श्रीनिवास वनगा यांना २ लाख ४३ हजार २१० मते मिळाली होती. तर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांना २,२२,८३८ मते तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराला ७१ हजार ८८७ मते काँग्रेसच्या दामू शिंगडा यांना ४७७१४ मते मिळाली होती.