लोकसभा निवडणूक 2024 चे बिगुल अखेर वाजलं आहे. नुकत्याच झालेल्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. देशात 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात 5 टप्प्यात लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. संपूर्ण देशभरात 19 एप्रिलपासून 1 जून अशा सात टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे पर्यंत पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. तर संपूर्ण लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रथमच मतदारांना वोट फॉर्म होम ही सुविधा देण्यात येणार आहे. 


प्रथमच मतदारांना 'वोट फॉर्म होम' सुविधा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीसाठी असलेल्या मतदान केंद्रावर मतदारांसाठी विशेष सोयी-सुविधा दिल्या जाणार आहेत. यंदा प्रथमच ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा दिली जाणार आहे. ज्या व्यक्तींचे वय 85 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त आहे, त्या मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेतले जाणार आहे. 


ज्या व्यक्तींचे वय 85 वर्षांपेक्षा अधिक आहे आणि जे दिव्यांग आहेत, त्यांच्या घरी जाऊन मतदान घेण्यात येईल. त्यासाठी त्यांना एक फॉर्म भरुन द्यावा लागेल. त्यानंतर त्यांच्या मतदानाच्या दिवशी त्यांच्या घरी मतपेटी नेली जाईल, अशी माहिती निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.


ही सुविधा 85 वर्षांच्या वृद्ध व्यक्तींसाठी


या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला निवडणूक आयोगाचा फॉर्म 12 डी भरून जमा करावा लागेल. निवडणुकांची घोषणा झाल्यापासून संबंधित लोकसभेची अधिसूचना जारी होईपर्यंत 15 दिवसांपर्यंत तुम्हाला अर्ज सादर करता येईल. त्यानंतर मतदानाच्या दिवशी अधिकारी स्वतः तुमच्या घरी येतील आणि बॅलेट पेपरवर तुमचं मत घेतील. ही सुविधा फक्त मतदान केंद्रांवर येऊ न शकणाऱ्या मतदारांसाठी असणार आहे. ही सुविधा 85 वयाच्या वृद्ध व्यक्तींसाठी असणार आहे. 


या पत्रकार परिषदेमध्ये राजीव कुमार यांनी मतदारांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार 1.82 कोटी तरुण पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. तर 82 लाख मतदार हे 85 वयापेक्षा अधिक आहेत. यंदाच्या मतदार यादीत महिलांचे प्रमाण जास्त आहे. या नवीन मतदार यादीत 85 लाख मुलींचा समावेश आहे. संपूर्ण देशात साडेदहा लाखांहून अधिक मतदार केंद्र आहेत. या मतदार केंद्रांवर पिण्याचे पाणी, शौचालय आणि व्हिलचेअरची सुविधा देण्यात येणार आहे. 


महाराष्ट्रात मतदान कधी?


महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. तसंच 26 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार असून यात महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे.


पहिला टप्पा – मतदान तारीख – 19 एप्रिल 
महाराष्ट्र - रामटेक, नागपूर, भंडारा, गरचिरोली, चंद्रपूर


दुसरा टप्पा – मतदान तारीख – 26 एप्रिल 
महाराष्ट्र - बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी


तिसरा टप्पा – मतदान तारीख – 7 मे 
महाराष्ट्र - रायगड, बारामती, उस्मानबाद, लातूर, सोलापर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, हातकणंगले


चौथा टप्पा – मतदान तारीख – 13 मे 
महाराष्ट्र - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड


पाचवा टप्पा – मतदान तारीख – 20 मे
महाराष्ट्र - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतल्या 6 जागा